‘काव्यवर्षा’तील कवितेमधून स्त्री वास्तव जीवनाचा संवेदनशीलतेने आविष्कार – एन. डी. राठोड

'काव्यवर्षा'तील कवितेमधून स्त्री वास्तव जीवनाचा संवेदनशीलतेने आविष्कार - एन. डी. राठोड

अहमदपूर (गोविंद काळे) : जीवनातल्या अनेक जाणिवांचा कवयित्रीच्या सुजाण व्यक्तिमत्त्वाने रसिकांशी साधलेला संवाद म्हणजे काव्यवर्षा आहे, कवयित्री वर्षा माळी यांनी स्त्री जीवनाचं वास्तविक आणि संवेदनशील चित्रण म्हणजेच ‘काव्यवर्षा’ कविता संग्रह आहे,असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ कवी एन.डी. राठोड यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा यशवंत विद्यालयाची आदर्श शिक्षिका वर्षा लगडे (माळी )यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न झाले ‘काव्य संग्रह प्रकाशन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, विचारमंचावर कवयित्री वर्षा लगडे माळी ज्येष्ठ कवी एन. डी. राठोड, विद्रोही कवी डॉ.मारोती कसाब, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी महादा चौकटे, आशा भराडिया व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड यांच्यासह शीघ्र कवी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सन २००० नंतरच्या मराठी कवितेचा प्रवाह वेगवेगळ्या अंगाने समृद्ध होत असला तरी ही काव्यवर्षा मधील कवितेच्या सहज साधेपणाचे वैशिष्ट्ये ठळकपणे आपल्या घरात मन करते. कवयित्रीचे कौटुंबिक, शैक्षणिक आणि सामाजिक जाणिवेशी असलेले नाते समजावून घेण्याच्या दृष्टिने हा कविता संग्रह परिपूर्ण आहे, असे ही ते म्हणाले. यावेळी डॉ. मारोती कसाब यांनी ही कविता संग्रहावर भाष्य केले. तसेच कवयित्री वर्षा लगडे यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेतलेल्या विविध वाङमयीन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर, सूत्रसंचालन डॉ.पांडुरंग चिलगर यांनी व आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!