निलंगा पंचायत समितीचा घरकुल योजनेत सावळागोंधळ
निलंगा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे. नणंद येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल योजनेत घरकुल एकाच्या नावावर व पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन प्रा.आण्णासाहेब मिरगाळे उपजिल्हाप्रमुख युवा सेना लातूर यांच्या वतीने गट विकास अधिकारी श्री.ताकभाते यांना देण्यात आले.
मौजे. ननंद येथील बापुराव भिमराव पाटील यांच्या नावावर दि. 4 .1 .2021 रोजी पंधरा हजार रुपये रक्कम पंचायत समितीकडून वर्ग करण्यात आली. संबंधित व्यक्तीने बांधकामास सुरुवात केली पण ग्रामसेवकाने घरकुल हे बाबुराव पाटील यांच्या नावाने आले असून खात्यावर पडलेली रक्कम बँकेत परत जमा करण्यास सांगितले व त्यांचे खाते होल्ड करण्यात आले. तशी तक्रार बापुराव भिमराव पाटील यांनी गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे. यासंबंधी गटविकास अधिकारी साहेब यांना झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता 23. 3 .2021 रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्यात येणार आहे असा शब्द दिला. पण त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. एखाद्या सामान्य माणसाला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चूक एकाची व शिक्षा दुसऱ्याला हा प्रकार कसा झाला. घरकुल एकाच्या नावावर व पैसे हे दुसऱ्याच्या खात्यावर कसे गेले याचे स्पष्टीकरण गटविकास अधिकारी साहेबांनी द्यावे, संबंधित व्यक्तीस न्याय द्यावा व तसेच जो कोणी या प्रकारात दोषी आढळून येईल त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.