विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते शिक्षक आमदार विक्रम काळे आणि नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार !
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी रोजी लातूर दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.विकासकामांमध्ये हडोळती ता.अहमदपूर जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हडोळती पाणी पुरवठा योजना कामाची पाहणी, शिरुर ताजबंद ता.अहमदूपर जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ : १ कोटी ५० लक्ष रुपये विकास कामांचा समावेश आहे. तसेच नवनिर्वाचित औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत संपन्न होणार आहे.
