कृषि व रेल्वे विभागाच्या जागा हस्तांतरित करा; मजविपचे फडणवीसांना साकडे
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर येथील जिल्हा रुग्णालयासाठी कृषि विभागाची, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी , आश्वासन दिलेली, रेल्वेची जागा त्वरित हस्तांतरित करण्याची आग्रही मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या शिष्टमंडळाने खा. सुधाकरराव शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर विमानतळावर भेट घेऊन केली.
आ. रमेशअप्पा कराड, मजविप लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, अभ्यास गटाचे प्रमुख महेंद्र जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास नवीन एम. आर. आय. यंत्रासाठी ताबडतोब 17 कोटी रु. मंजूर करुन देण्यात यावेत, ही मागणीही मजविप च्या लातूर महानगर शाखेने यावेळी केली.
वरील प्रमुख मागण्यांव्यतिरिक्त, युती सरकारच्या काळात लातूरसाठी शासनाने मंजूर केलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही अद्याप सुरु झालेले नाही. येत्या जून 2023 पासून ते सुरु करावे, तसेच शहराच्या भर वस्तीतून जाणारा रत्नागिरी- नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बाहेरच्या बाजूने काढावा, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
