अहमदपूरात ‘प्रिस्टाइन’ कडून शिवजयंती निमित्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात १३ फेब्रुवारी २३ रोजी सोमवारी पुणे येथील ‘प्रिस्टाइन’ कडून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि. पुणे यांच्या साह्याने सदरील मोफत आरोग्य तपासणी शिबिर सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आयोजित केले असून, या शिबिरात जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी पूर्णपणे मोफत असून, या तपासणीद्वारे डायबिटीस, लहान मुलांच्या समस्या , महिलांचे आरोग्य तक्रारी, ब्लडप्रेशर, मुळव्याध, डोळ्यांच्या समस्या, कॅन्सर , पॅरालिसिस, किडनी स्टोन, तसेच संधिवात, ऍसिडिटी, मुतखडा, हाडांचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक, हार्ट प्रॉब्लेम, तसेच वजन कमी करणे, वाढवणे आदी समस्यांचे निदान केले जाणार असून रुग्णांना कमीत कमी दरात औषधांचे वाटपही यावेळी केले जाणार आहे.
या शिबिरासाठी पुणे येथून सुप्रसिद्ध वैद्य , प्रिस्टाईन आयुर इंडिया या संस्थेचे प्रमुख डॉ. प्रवीण बढे ( एम. डी. पीएच.डी.आयुर्वेद) हे खास करून उपस्थित राहणार असून त्यांना भारत भूषण पुरस्कार, शौर्य भारत पुरस्कार, वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन पुरस्कार, देवदूत पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार तसेच राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. सोबतच ज्येष्ठ आरोग्य सल्लागार तानाजी माने, बापुसाहेब काळे, सचिन पवार, गजानन मोरे यांच्यासह प्रिस्टाईन आयुर प्रा.लि., पुणे चे ज्येष्ठ आरोग्य सल्लागार उपस्थित राहुन आरोग्य तपासणी करणार असल्याचे संयोजन समितीने सांगीतले आहे. तरी, अहमदपूर आणि परिसरातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांच्यासह संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सह कार्यक्रमाधिकारी डॉ.सतीश ससाणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यास केंद्राचे डॉ. अनिल मुंढे, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले आहे.
