‘लॅम्प लाईटिंग-2023’ स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
उदगीर(एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ व संस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त “लॅम्प लाईटिंग-2023” स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते, तर उदघाटन आनंद हॉस्पिटल अँड क्रिटिकल केयर सेंटर उदगीर येथील डॉ. अजय सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.या स्नेहसंमेलनासाठी विशेष निमंत्रित म्हणून सिने अभिनेत्री बंगळूर येथील सुमा राजकुमार या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शोभा मनकोले,क्रांती बिरादार, यांची उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे एच.आर.मॅनेजर कृष्णा गथडे, प्राचार्य गणेश तोलसरवाड, प्राचार्य ज्योती स्वामी-तारे, प्राचार्य नागेसन तारे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनंजय गोंड,अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार,स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील परीक्षा नियंत्रक डॉ. एस. एन, जाधव,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, जय हिंद पब्लिक स्कूलचे संचालक संजय हट्टे, जय हिंद ज्युनिअर कॉलेजचे अतेंद्र सिंग, प्राचार्य नुतन नाईक, उपप्राचार्य मनोरमा शास्त्री,सांस्कृतिक प्रमुख ज्योती स्वामी यांची उपस्थिती होती.
या स्नेहसंमेलनात ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा विषय विद्यार्थ्यांना कलाविष्कारासाठी ठेवण्यात आला होता.लॅम्प लाईटिंग या थीम वर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर एका पेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थ्यांनी लोकगीत, चित्रपट गीत, यावर वैयक्तिक व सामूहिक कला सादर केली.
प्रारंभी स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री सुमा राजकुमार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,विद्यार्थ्यांनी स्वतःहून या क्षेत्रात आले पाहिजे.आपण समाजाचे काही देणं लागतो, ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने आपले काम पार पाडले पाहिजे. नर्सिंगचे विद्यार्थी म्हणून तुमच्या वर फार मोठी जबाबदारी आहे. लोक आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत असतात, तेव्हा आपल्या जबाबदारीच भान ठेवून सदैव सेवा देण्याचे कार्य आपण करावे, असे त्या म्हणाल्या.पुढे बोलतांना त्यांनी सिने क्षेत्रात येत असताना घेतलेल्या कष्टाबाबत माहिती दिली.आपले ध्येय प्राप्त करायचे असेल तर अभ्यास करा असे ही त्या बोलल्या.
याप्रसंगी स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप असे म्हणाले की,आपल्या सर्वांसाठी कारोनाचा काळ हा फार वेदनादायी होता. या काळात आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याला भेटत नव्हत्या. हॉस्पिटल मध्ये परवानगी नव्हती. पेशंट आत आणि आपण घरी अशी परिस्थिती होती. अशा या अतिशय त्रासदायक स्थितीत जर कोणी आपल्याला साथ दिली असेल तर ती या नर्स,वॉर्डबॉयनी दिली.आपला नातेवाईक असो,मित्र असो या सर्वांची जबाबदारी अतिशय प्रेमळपणे यांनी पार पाडली. त्यांना करोना झाल्यानंतरचा अनुभव ही त्यांनी यावेळी उपस्थिताना सांगितला.
या लॅम्प लाईटिंग स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक प्राचार्य ज्योती तारे यांनी केले. सूत्रसंचालन फ्लॉरेन्स नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागेसन तारे,प्रिंसी बी.यांनी केले. तर आभार श्रद्धा सोनकांबळे यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिल्पा कवठे,सिद्धेश्वर भाडे, गजेंद्र गीते, अतिश इंगोले, बालाजी कदम,नरसिंग जनके,सुरेश पवळे, शकुंतला सोनकांबळे, रवी धोंड, इत्यादिंनी परिश्रम घेतले.
