पोलिस नाईक निशीधन शिंदे यांचे कोरोनामुळे निधन
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलिस नाईक निशीधन माणिकराव शिंदे (वय ३६) यांचे कोरोनामुळे दि. 1 एप्रिल गुरूवारी सकाळी पहाटे लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिस नाईक निशीधन शिंदे हे शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे लातूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. २००६ साली त्यांनी पोलीस दलात नोकरी मिळवली होती. सुरूवातीला लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काही वर्षे नोकरी झाल्यानंतर शिरूर अनंतपाळ येथे त्यांची बदली झाली होती. कोरोनाच्या संकट काळात भूमिका बजावित असताना त्यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोना झाला होता. त्यातून ते बरे झाले परंतु त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा त्यांना कोरोनाने गाठले. गुरूवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, तीन भाऊ असा परिवार आहे.