उदगीरच्या शैक्षणिक प्रगतीत ब्राईट स्टार हायस्कूलचे मोठे योगदान – बाळासाहेब मरलापल्ले
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीमध्ये गेल्या दोन तपापासून उच्च दर्जाचे शिक्षण देत असतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी ब्राईट स्टार हायस्कूलने मोठे योगदान दिले आहे. गेल्या 24 वर्षापासून सर्वसामान्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या पाल्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण सहज उपलब्ध व्हावे. म्हणून प्राचार्य वीरभद्र घाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम निश्चित कौतुकास्पद आहेत. असे गौरवउद्गार उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब मारलापल्ले यांनी काढले. ते ब्राईट स्टार हायस्कूलच्या 24 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समीर, निडेबनचे उपसरपंच पप्पू शेख, ब्राईट स्टार हायस्कूलचे प्राचार्य तथा संयोजक वीरभद्र घाळे, प्रा. सौ. प्रेमा घाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, प्रा. अजिंक्य घाळे, प्रा. ऋतुजा घाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब मारलापल्ले यांनी स्पष्ट केले की, उदगीर ही शिक्षण पंढरी म्हणून आज ओळखली जाते आहे. उदगीर शहराला जसा ऐतिहासिक वारसा आहे, तसाच सांस्कृतिक वारसाही आहे. क्रीडा क्षेत्रातही उदगीरचे नाव देशपातळीवर गाजलेले आहे. अशा स्वरूपातील प्रगतीसाठी उद्याचे राष्ट्राचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्याला घडवणाऱ्या शाळांचे मोठे योगदान असते. गेल्या दोन तपापासून ब्राईट स्टार हायस्कूलच्या माध्यमातून जे योगदान समाजासाठी दिले जात आहे, ते निश्चितपणे वाखाण्याजोगे असून इतर शैक्षणिक संस्थांनी याचा आदर्श घ्यावा, असेच आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर भाग्यश्री घाळे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून शाळेच्या विकासाचा आलेख प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी व पालकांच्या समोर त्यांनी मांडला. याप्रसंगी प्रा. शिवाजीराव मुळे यांनीही ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध कला गुणदर्शन दाखवले त्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य, कोळी नृत्य, पोवाडे, गोंधळ, देशभक्तीपर गीत, दांडिया, पाण्याचे महत्व सांगणारा मुक अभिनय, फॅन्सी ड्रेस अशा विविध गुणदर्शनासह आपल्या दैदिप्यमान परंपरांची जपवणूक करून दाखवली. इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार संयोजक प्राचार्य विरभद्र घाळे यांनी व्यक्त केले.