मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्याबद्दल उदगीरात आनंदउत्सव !
उदगीर (एल पी उगीले) : महाराष्ट्रात शिवसेना पक्षांतर्गत गटबाजी वरून वाद टोकाला पोहोचला आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे वेगवेगळे वाद प्रलंबित आहेत. अशातच निवडणूक निर्वाचन आयोगाने लोकप्रतिनिधींची संख्या, प्रत्यक्ष निवडून आलेल्या आमदार, खासदार यांची संख्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची संख्या विचारात घेऊन तसेच पक्ष संघटनेची ध्येयधोरणे प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करतो? शिवसेना या पक्ष संघटनेच्या आदर्श आचारसंहितेप्रमाणे कोणाची वाटचाल चालू आहे. अशा महत्त्वाच्या वेगवेगळ्या पातळीवरून अभ्यास करून निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे उदगीर मध्ये शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच छत्रपती शाहू महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. याप्रसंगी जमलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे लातूर जिल्हा संघटक जेष्ठविधीज्ञ गुलाब उर्फ बापूराव पटवारी यांनी सांगितले की, अखेर सत्याचा विजय झाला आहे, “सत्य परेशान होता, है पराभूत नही”याचा प्रत्यय या निकालाने दिला आहे. भविष्यकाळात शिवसेनेची शक्ती वाढवण्यासाठी अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शक्ती दाखवणे गरजेचे आहे. असेही आवाहन त्यांनी केले. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार, खासदार तसेच देशभरातून वेगवेगळ्या राज्यातील पदाधिकारी, शिवसैनिक यांची संख्या विचारात घेऊन शिवसेना आणि धनुष्यबाणी चिन्ह आपल्या बाजूने जाहीर केले आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे सांगितले. याप्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज चिखले यांनी केले.