12 मोटारसायकलीसह 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल गांधी चौक पोलिसांकडून हस्तगत

12 मोटारसायकलीसह 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल गांधी चौक पोलिसांकडून हस्तगत

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील विविध गुन्ह्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत, गांधी चौक पोलिसांनी आपल्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकाने आपली जबाबदारी चोख बजावत, 12 मोटारसायकली सह चार लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी, लातुर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.

सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 20/02/2023 रोजी सदरचे पथक सिद्धेश्वर यात्रेत पाई पेट्रोलिंग करीत असताना एक इसम मोटर सायकल ढकलत जात असताना दिसला पोलीस पथकाला संशय आल्याने त्यास पोलीस पथकाने ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारपुस केली त्यांने उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यास विश्वासात घेवून माहीती विचारली असता सदरची मोटरसायकल बसस्थानक लातुर येथुन चोरी केलेचे सांगीतले.

तसेच कोल्हापूर पुणे अंबाजोगाई व लातूर लातूर शहरातून विविध ठिकाणाहून इतर आणखीन 11 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून सदरच्या विविध कंपनीच्या 11 मोटरसायकल व त्याच्या ताब्यातील एक मोटर सायकल अशा एकूण 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी प्रकाश नागुराव मोरे (वय-33 वर्षे रा- भालगाव ता .केज जि. बीड),यास पोलीस ठाणे गांधी चौक गु.र.न -78/23 कलम-379 भादवि मध्ये अटक करण्यात आली आहे.गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या 12 गुन्ह्याची उकल करून 12 मोटार सायकलसह 4 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार दामोदर मुळे, रणवीर देशमुख , रणजित शिंदे, दत्ता शिंदे, भाऊसाहेब मंथलवाड सुदर्शन पाटील शिवाजी पाटील, शिवराज अनंतवाड. उपविभागीय कार्यालय शहर यांचे पथकातील- सफौ- ढगे, पारडे, सोनटक्के यांनी पार पाडली.

About The Author