मिरची पूड डोळ्यात टाकून नऊ लाख पळवले

मिरची पूड डोळ्यात टाकून नऊ लाख पळवले

देवणी (एल.पी.उगीले) : देवणी येथील एका सुप्रसिद्ध व्यापाऱ्यास त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून, त्याच्या जवळील नऊ लाख 5 हजार रुपये असलेली बॅग पळवल्याची घटना देवणी शहरातील बसस्थानकासमोर घडली आहे. व्यापारी रात्री दुकान बंद करून घराकडे जात असताना चोरट्यांनी संधी साधून भर वस्तीत बाजारात व्यापाऱ्याला लुटले आहे. या घटनेमुळे देवणी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून हाती आलेली माहिती अशी की, देवणी येथील व्यापारी उमाकांत जगदीश जीवणे हे आपल्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून, पैशाची बॅग सोबत घेऊन घराकडे जात होते. त्यांना बस स्थानकासमोरील घराच्या वाटेवर आडउन लुटारुणी त्यांच्या जवळील बॅग लुटण्यासाठी मिरची पावडरचा वापर करून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. ते गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच त्यांच्या जवळील नऊ लाख 5 हजार रुपये असलेली बॅग हिसकावून घेऊन चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे करत आहेत. या घटनेमुळे देवणी शहरासह आजूबाजूच्या परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांची दैनंदिन माहीत असलेल्या आणि त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या जवळच्याच कोण्या तरी व्यक्तीने चोरट्यांना टीप दिली असावी अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. देवनी पोलिसासमोर ही घटना म्हणजे एक आव्हान ठरले आहे.

About The Author

error: Content is protected !!