Breaking News : चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार
निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील शेडोळ या गावी एका 25 वर्षीय व्यक्तीने सात वर्षे वयाच्या लहान बालिकेवर चॉकलेटचे आमिष दाखवून बोलावून घेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अकरम जिबराल मुल्ला या पंचवीस वर्षिय युवकाने घराबाहेर खेळत असलेल्या एका सात वर्षे वयाच्या मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून जवळ बोलावून घेतले.
त्यानंतर तिला जवळच्या दर्ग्याच्या मागे नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ती अल्पवयीन मुलगी या त्रासामुळे गोंधळून जाऊन आरडाओरडा करू लागली. तेव्हा आरोपीने तिला धमकावले आणि तिला तिथेच सोडून तेथून पळ काढला. थोड्या वेळानंतर पीडित मुलीने घरी येऊन आपल्या आई-वडिलांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनी निलंगा पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दिली. सदरील फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 376 (ए) (बी )377, 504, 506 भारतीय दंड विधान संहिता सह कलम 4(2) 7,8, 12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 कलम 3 (आय )अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे हे करत आहेत.