मातृभाषेबरोबरच बहुभाषिकता जपावी – डॉ.सुरेश शिंदे
उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे हे उपस्थित होते. यावेळी ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या विषयावर गटचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या गटचर्चा साठी प्रमुख चर्चेक म्हणून शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे व टंकलेखक सूरज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.या गटचर्चेत प्रा.धनराज बंडे,डॉ.मनोहर भंडारे, डॉ.कांचन मुळे,प्रा.आर.टी.कांबळे, प्रा.वर्षा कांबळे याबरोबरच वैष्णवी केंद्रे,निकिता वाडीकर,अदिनाथ बालुरे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. गटचर्चेचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केले.यावेळी बोलताना डॉ.सुरेश शिंदे म्हणाले की, मराठी भाषेला उज्ज्वल भवितव्य आहे. ही भाषा आचरणात आणली पाहिजे. ती व्यवहाराची भाषा झाली पाहिजे.मराठीतील वेगवेगळ्या बोलींचा अभ्यास नीटपणे करणे गरजेचे आहे.मराठी भाषिकांनी बहुभाषिकता जपत मराठी भाषेचा गौरव करायला हवा. सूरज चौधरी म्हणाले,मराठी भाषेत इतर भाषेचे आक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे. परकीय भाषेला पर्यायी शब्द देता आले पाहिजे. वाढत्या इंग्रजी शाळा, शासनाचे मराठी भाषेकडे दुर्लक्ष, मराठी भाषेविषयी समाजाची नकारात्मक मानसिकता आणि मराठी भाषेला खरा धोका शिकलेल्या माणसांकडूनच असल्याची खंत यावेळी व्यक्त केली.
गटचर्चेच्या समारोप प्रसंगी बोलताना उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे म्हणाले की, मराठी भाषा लोप पावू शकत नाही.नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेला अतिशय महत्त्व आहे. संस्कृती टिकवायची असेल, तर मातृभाषेकडे दुर्लक्ष करता येत नाही.असे भाष्य करीत मराठी विभागाच्या वतीने आयोजित गटचर्चा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी गटचर्चेत मराठी भाषेच्या भवितव्याविषयी सखोल आणि बहुअंगाने चर्चा करण्यात आली.मराठी ही व्यवहाराची भाषा झाली पाहिजे.मराठी भाषेतील चांगल्या कलाकृती आणि इतर भाषेतील चांगल्या कलाकृतीचे अनुवाद झाले पाहिजे.संस्कृतीचे जतन भाषा करीत असते.व्यक्ती,समाज, भाषा, संस्कृती आणि साहित्य हे घटक परस्परपूरक असतात. भाषेमुळे इतर घटकांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भूमिका चर्चकांनी यावेळी मांडली. या गटचर्चासाठी प्र.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. गटचर्चेचे निवेदन डॉ.म.ई.तंगावार यांनी केले तर आभार डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी मानले.
