श्यामलाल हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये 28 फेब्रुवारी हा दिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. जयप्रकाश पटवारी उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद चोबळे व प्रमुख अतिथी डॉक्टर जयप्रकाश पटवारी , पंडितराव सुकनिकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच शाळेतील विज्ञान शिक्षकांनीही डॉक्टर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मानवी जीवनात विज्ञानाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्टरित्या भाषण केलेल्या ढगे रागिनी प्रदीप, जाधव मानसी धनाजी,बिरादार साईविश्व या विद्यार्थ्यांना शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, प्रमुख अतिथी डॉक्टर जयप्रकाश पटवारी, शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले.
प्रमुख अतिथी प्रा.डॉक्टर जयप्रकाश पटवारी यांनी विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल झाला, अनेक विकासाचे टप्पे मानवाने पादाक्रांत केले आहेत, विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, मानव जातीच्या कल्याणासाठी व विकासासाठी आहेत. त्याचा दुरुपयोग कोणीही करू नये, निसर्गाच्या सानिध्यात राहून शाश्वत विकास कसा होईल? याकडे लक्ष दिले पाहिजे, पर्यावरणाचे जतन, निसर्गाचा समतोल राखला जाईल अशी जीवनशैली मानवाची यापुढे असली पाहिजे. तरच ही जीवसृष्टी टिकेल, असे मत याप्रसंगी व्यक्त केले.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित छोटीशी नाटिका सादर करून अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता विज्ञानावर विश्वास ठेवून आपली प्रगती करावी असा संदेश दिला.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात साठ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रभावीपणे प्रयोग सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर जयप्रकाश पटवारी, शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे,प्र. उप. मु. बालाजी चव्हाण शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर यांनी विज्ञान विषय विभाग प्रमुख अविनाश घोळवे, राहुल लिमये, कालिंदी जाधव, उमाकांत सूर्यवंशी, धनश्री जाधव, जेठुरे शीतल, आसमा उंटवाले व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या, व विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास करून मानवाच्या व पर्यावरणाच्या समृद्धीसाठी प्रयत्न करावेत असा संदेश दिला.कार्यक्रमाचे प्रभावीरित्या सूत्रसंचालन मुदुडगे यशश्री व बिरादार शुभांगी या विद्यार्थिनींनी केले. सजावट व रांगोळी सुलभा तोलनवार व विद्यार्थिनी यांनी आकर्षक रित्या काढली. स्वागत गीत अनुष्का पाठक या विद्यार्थिनीने सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी केले. व शुभेच्छा दिल्या.
