सिध्दी शुगरचे साडेपाच लाख मे. टन ऊसाचे गाळप
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि कडुन गळीत हंगाम २०२० -२१ च्या १५८ दिवसात ५ लाख ४२ हजार ६९३ मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले.
याविषयीची अधिक माहीती अशी की, सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. महेश नगर, उजना या साखर कारखान्याने हंगाम २०२०-२१ च्या गळीत हंगामात १५८ दिवसात पाच लाख बेचाळीस हजार सहाशे त्र्यानंव मे.टन ऊसाचे गाळप करुन पाच लाख तिस हजार दोनशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व तसेच बी हेवी मोलॅसीसचे उत्पादन विचारात घेता साखर उतारा १०.५८ टक्के इतका आला आहे.
या वर्षीच्या २०२०-२१ या यशस्वी गळीत हंगामाचा सांगता समारंभ ६ एप्रिल रोजी कारखान्याचे मार्गदर्शक व आधारस्तंभ तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कारखान्याचे चेअरमन व अहमदपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी.होनराव, जनरल मॅनेजर तथा फॅक्टरी मॅनेजर बी.के.कावलगुडेकर, जनरल मॅनेजर ( केन ) पी.एल.मिटकर, जनरल मॅनेजर ( प्रोसेस ) सी.व्ही.कुलकर्णी , ऊस पुरवठा अधिकारी भाकरे पी.जे.यांच्या हस्ते गव्हाण पुजन करुन सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी कोवीड -१९च्या परिस्थितीमुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सांगता समारंभ संपन्न झाला. चालु हंगामात विक्रमी गाळप केल्याबददल माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वहातुक ठेकेदार , मजुर या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी ऊस तोडणी व ऊस वहातुकीमध्ये प्रथम , द्वितीय व तृतीय आलेल्या वहातुक ठेकेदार व तोड मुकदम यांना प्रशिस्तीपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अधिकारी , कर्मचारी व कामगार यांना प्रोत्साहन म्हणुन १२ दिवसांचा पगार बक्षीस म्हणुन जाहिर करण्यात आला. तसेच डिस्टीलरीमध्ये बी हेवी पासुन इथेनॉल ऊत्पादनही करण्यात आले.