वाहतूक शाखेच्या मदतीलाआता ‘ट्राफिक अॅम्बेसेडर’
लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आता शहर वाहतूक शाखेच्या मदतीला आता ‘ ट्राफिक ॲम्बेसेडर ‘ नामक समाजसेवींची फौज धावून येणार आहे. मंगळवारी गांधी चौक पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेत या संदर्भात झालेल्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाहतूक शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कदम होते. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या दृष्टीने उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी अनेक सूचना व अभिनव कल्पना मांडल्या. प्रारंभी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी वाहतूक समस्यांवर ऊहापोह करीत अनेक उपयुक्त सूचना केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे डाॅ.बी.आर. पाटील यांनी संपूर्ण शहरातील वाहतूक प्रश्नांचा आढावा घेत वाहनचालक, प्रवासी व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मराठवाडा जनता विकास परिषदेचे लातूर महानगर शाखेचे तसेच ‘ माध्यम’ विचारपीठाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी शहरातील ऑटोचालक युनियनची व्यापक बैठक घेऊन त्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याविषयी प्रबोधन करावे, अशी सूचना केली. तसेच बॅन्का, क्लासचालक , लाॅजमालक यांना भेटून त्यांच्या ग्राहकांच्या वाहनांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याच्या सूचना कराव्यात, असा विचार व्यक्त केला. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एस.टी.महामंडळाने सहकार्य करावे, लातूर महानगर पालिका प्रशासनाने ऑटोरिक्षा थांब्यांसाठी रस्त्यांची दुरुस्ती करावी, वाहतूक नियमांचा भंग करणारे वाहनचालक, रस्त्यावर अतिक्रमण करणारे व्यापारी, ट्युशन एरियातील अव्यवस्थित वाहन व्यवस्था आदी समस्या सोडविण्यासाठी त्या त्या संबंधितांना दोन वेळा सामंजस्याने सूचना करूनही पुन्हा त्यांनी नियमभंग केल्यास कडक कायद्याचा बडगा उगारुन वाहनजप्ती करावी. शहरातील विद्यार्थी, नागरिकांमध्ये वाहतूक जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी, आदी अनेक सूचनांची दखल वाहतूक शाखेने यावेळी घेतली .या व्यापक बैठकीस गिरीश ब्याळे, श्रीमंत कावळे, विरेंद्र फुंडीपल्ले , प्रा. दीपक नावाडे, दीपाली राजपूत, इस्माईल शेख, हेमंत रामढवे, अमोल दाडगे, आदित्य शास्त्री, दिलीप पिनाटे, भागवत पांचाळ, निळकंठ स्वामी, सुदर्शन बोराडे, देवेंद्र आयलाने, नागनाथ आगवाने, नितीन कामखेडकर, ट्राफिक ब्रॅन्चचे लक्ष्मण बिरादार, महादेव पांडे, ॲड. संगमेश्वर रासुरे आदींची उपस्थिती होती.