सर्वच क्षेत्रात महिलांची गगन भरारी – सौ. संजीवनी कराड
लातूर (प्रतिनिधी) : स्त्री सक्षम आणि परिपूर्ण असल्याने तिला कमी लेखून चालणार नाही, पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. संधी मिळाल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात कुटुंब सांभाळून आपल्या कार्याचा ठसा निर्माण करत गगन भरारी घेतल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च बुधवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या रोप्य महोत्सवी वर्षा निमित्त लातूर शहरातील विविध वैद्यकीय शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती अभूतपूर्व रॅली यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथून काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ संजीवनीताई कराड यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी लातूर एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन.पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, शैक्षणिक व प्रशासकीय संचालिका डॉ. सरिता मंत्री, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विमल डोळे, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. चंद्रकला पाटील, एमआयटी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर्वानन सेना, फिजिओथेरपी कॉलेजच्या डॉ. पल्लवी जाधव, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे रुग्णालय प्रशासक अधिकारी श्रीपती मुंडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
चूल आणि मूल एवढ्या पुरते मर्यादित न राहता आपले कुटुंब सांभाळून राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यवसायासह सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत, असे सांगून सौ, संजीवनीताई कराड यांनी महिलांच्या कलागुणांना पुरुषांनी प्रोत्साहन द्यावे असे बोलून दाखविले. एमआयटी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार यावेळी बोलताना म्हणाले की, स्त्रीशक्तीवरच माणसाचे जीवन अवलंबून आहे. पती, मुले आणि कुटुंब या सर्वांची काळजी करते ती फक्त महिलाच ! असे सांगून महिला दिनाच्या निमित्ताने सर्व स्त्रीशक्तीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे म्हणाले की महिला म्हणजे सर्वस्वी आदिशक्ती आहे ज्ञान हवे असेल तर सरस्वती, धन हवे असेल तर लक्ष्मी आणि शक्ती हवी असेल तर दुर्गा ; पुरुषाकडे काय आहे ? असा प्रश्न उपस्थित करून ज्यांना पत्नी समजली ते राम झाले, ज्यांना बहिण समजली ते ज्ञानोबा झाले आणि ज्यांना आई समजली ते शिवबा झाले अशा शब्दात स्त्रीशक्तीचा त्यांनी सन्मान केला. डॉ. बी. एस. नागोबा यांनी स्त्री जीवनाच्या प्रत्येक क्षणी आई, बायको, बहीण, मुलगी, मैत्रीण या सर्व नात्यातून कर्तव्य बजावते. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या डॉ. सरिता मंत्री यांनी आपल्या मनोगतातून स्त्री शक्तीच्या कर्तुत्वाचा गौरव केला तर डॉ चंद्रकला पाटील यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका विषद केली. राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर डिघोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महिलांना द्या सन्मान देश होईल महान; स्त्री शक्तीचा विजय असो; जबाबदारी सह घेते भरारी तिचे नाव नारी अशा अनेक गगनभेदी घोषणा देत निघालेल्या या रॅलीत एमआयटी मेडिकल कॉलेज, विलासराव देशमुख शासकीय मेडिकल कॉलेज, बी.व्ही. काळे मांजरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, महाराष्ट्र सायन्स नर्सिंग कॉलेज, एमआयटी नर्सिंग कॉलेज, एमआयटी फिजीओथेरपी कॉलेज, एमआयटी दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी या सहभाग घेतला होता. जागतिक दिनाच्या या कार्यक्रमास डॉ. विद्या कांदे, डॉ. क्रांती केंद्रे, डॉ. शैला बांगड, डॉ. शितल शेळके, डॉ. भट्टड, डॉ. आरती माने, डॉ. शिल्पा दडगे, डॉ. पद्मावती चन्नास्वामी, डॉ. शितल घुले, डॉ. रिशा कांबळे, डॉ. मधुरा देशपांडे, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. वीरेंद्र मेश्राम, डॉ. कांती जाधव, डॉ. पायल राठोड, डॉ. रोशनी आकुसकर, पल्लवी उगीले, अर्चना हांगे, आयेशा वाघमारे, सुचिता भागवते यांच्यासह विविध कॉलेजमधील प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.