अहमदपूर जागतिक महिला दिन पंचायत समितीच्या वतीने उत्साहात साजरा

अहमदपूर जागतिक महिला दिन पंचायत समितीच्या वतीने उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : आज देशामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय, विनयभंग, बलात्कार असे अत्याचार करून स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. त्यामुळे स्त्री ही सर्जनशील व्यक्ती म्हणून तिचा समाजातील सर्व सरांच्या मध्ये सन्मानाने वागविले पाहिजे. असे आग्रही मत महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे -तत्तापुरे यांनी केले. त्या दि. 8 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंचायत समितीच्या वतीने आयोजित सभागृहा मध्ये महिला सरपंच, महिला ग्रामसेवक यांच्या एक दिवसीय कार्यशाळा व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बालविकास अधिकारी शोभा घोडके, आरोग्य अधिकारी डॉ. अंजली कोतलापुरे, आर एस जे वाय च्या प्रवीण प्रशिक्षक नीता मगर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आशा रोडगे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ ने शिवाजी महाराजांना घडविले म्हणून स्त्री म्हणजे आदर्श आई, आजी, कन्या, बहीण, मैत्रीण, पत्नी, सून, वहिनी, मावशी असल्याचे सांगून देशातील सर्वच घरांच्या मध्ये तिला जपले पाहिजे. तिची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी नीता मगर, डॉक्टर अंजली कोतलापुरे, शोभा घोडके, सरपंच ज्योती केंद्रे, सरपंच अनुपमा खंदारे, सरपंच अश्विनी कचवे यांचे मनोगत पर भाषण झाली. तर दुसऱ्या सत्रात न्यायाधीश एस एस तोंडचिरे, न्यायाधीश अश्विनी जरुढे, न्यायाधीश के बी गाडीवाले यांचे स्त्रियांचे कौटुंबिक हिंसाचार, महिला आणि कायदे, बाल लैंगिक, शोषण आणि अत्याचार, महिलांच्यावर ऍसिड हल्ला आणि स्त्रियांच्या सामाजिक न्यायावर भाष्य केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड यांनी केला. या समयी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, भगिनींचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्याचा शुभारंभ जिजाऊ, सावित्रीआणि अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड यांनी सूत्रसंचालन विस्ताराधिकारी डी व्ही सुळे यांनी तर आभार सहाय्यक प्रशासन अधिकारी शैलेश जोशी यांनी मांनले. या सोहळ्याला महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, बचत गटाच्या कार्यकर्त्या, घरकुल बांधकाम कार्यकर्त्या, क्रीडा क्षेत्रातील मुली आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश सोनकांबळे, शिवाजी आबंदे यांच्यासह पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी विशेषतः महिला कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author