दयानंद कलाचे एक पाऊल पुढे : महविद्यालयीन कर्मचाऱ्यांची सामूहिक लसीकरण मोहीम यशस्वी!
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात वाढत असणाऱ्या कोविड-१९ रुग्ण संख्या व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. नोकरी व आस्थापनेच्या ठिकाणी ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरणाच्या हालचाली अनेक दिवसांपासून सुरू होत्या. यात शासकीय व खाजगी कंपन्या आणि उद्योगसमूहांना केंद्र सरकारने ११ एप्रिल २०२१ पासून अंमलबजावणीस परवानगी दिली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती पाहून व वेळेचे महत्त्व जाणून दयानंद कला महाविद्यालयाने दि.०७ एप्रिल२०२१ रोजी ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांचे सामूहिक कोविड- लसीकरण मोहीम प्रा.आरोग्य केंद्र पानचिंचोली ता. निलंगा येथील डॉ. योगेश पाटील, डॉ.मोरे, आरोग्य सहाय्यक गणेश कांबळे ए.एन.एम. रेखा भोसले आदिच्या प्रयत्नाने राबवली आहे. यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. शिवाजी जवळगेकर, डॉ. रमेश पारवे, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे व डॉ. गोपाळ बाहेती व कार्यालयीन कर्मचारी आदीनां यशस्वी लसीकरण करण्यात आले. कोविड – लसीकरण मोहीम दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललितभाई शहा, प्रदीप राठी, सहसचिव सुरेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
दयानंद शिक्षण संस्थेने कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने १४ एप्रिल २०२० पासून ऑनलाईन टिचिंगचा निर्णय घेऊन त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली . दयानंद शिक्षण संस्थेच्या दुरदृष्टी उपक्रमा बद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांनी कौतुक केले व ऑनलाइन टिचिंग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केली. तसेच कोव्हिड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस , स्वच्छता कर्मचारी, बॅक कर्मचारी, पत्रकार, लातूर महानगरपालिका कर्मचारी आदी कोविड योध्दा यांना महाविद्यालयाच्या वतीने सॅनीटायझर व मास्क वितरित करण्यात आले. कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी महाविद्यालय सदैव शासनाच्या नियमांचे व मार्गदर्शन तत्वाची अंमलबजावणी करून एक पाऊल पुढे जाऊन कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी केले.