बलात्कार प्रकरणातील नराधमास तात्काळ अटक करा

बलात्कार प्रकरणातील नराधमास तात्काळ अटक करा

भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा स्वाती जाधव यांची मागणी

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करणार्‍या नराधमास तातडीने अटक करा आणि त्या बालिकेवर वैद्यकीय उपचार करण्यास टाळाटाळ करणार्‍या दोषी डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती जाधव यांनी केली आहे.

निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील अक्रम जिब्राईल मुल्ला या नराधमाने गावातील सात वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून दर्ग्याच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. निलंगा पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद असून आरोपी अद्यापही फरार आहे. सदरील दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती जाधव यांनी शेडोळ येथे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच घटनास्थळी पाहणी केली.

निलंगा येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित बालिकेवर वैद्यकीय उपचार करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. कोरोना काळात देव म्हणणार्‍या डॉक्टरांनी माणुसकी विसरली असा आरोप करून स्वाती जाधव यांनी संबंधित डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याशिवाय दुर्दैवी घटनेतील नराधम आरोपीस पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. फरार असणार्‍या आरोपीस तात्काळ अटक करावी अशीही मागणी स्वाती जाधव यांनी केली.

झोपेचे सोंग घेतलेल्या महाविकास आघाडीच्या निष्क्रिय सरकारच्या राजवटीत कोणीही सुरक्षित नाही. महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. हे सरकार फक्त वलगना करून जनतेची दिशाभूल करीत आहे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी होत नाही. शेडोळ येथील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, ऍड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून पिडीत बालिकेस न्याय द्या अशी मागणी करून भाजपा याप्रकरणी स्वस्थ बसणार नाही. असा इशारा स्वाती जाधव यांनी दिला.

About The Author

error: Content is protected !!