उदगीर शहरात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वस्तीगृह उभारण्याची आ.बनसोडे यांची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघात मराठा समाज बांधवांची लक्षणीय संख्या असून त्यातच उदगीर तालुका हा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असल्याने या तालुक्यात मराठा समाजाच्या मुला मुलींची संख्या जास्त आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात वस्तीगृह उभारावे, अशी मागणी येथील समाज बांधवांची होती. या मागणीचा विचार करून महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी मराठा समाजातील मुला मुलींसाठी भव्य व अत्याधुनिक स्वरूपाचे वसतिगृह उभारावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात आ.बनसोडे यांनी, उदगीर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे अनेक शिक्षण संस्था आहेत. येथे मराठा समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत असतात. परंतु यांच्यासाठी वस्तीगृहाची सुविधा नाही. या परिसरात अनेक विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शासकीय वस्तीगृह सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मराठा समाजातील मुलामुलींसाठी २०० क्षमतेचे वस्तीगृह उभारण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन आ.बनसोडे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवुन संबंधित विभागास तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उदगीर तालुका हा तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात विविध शैक्षणिक संकुले अस्तित्वात आहेत. उदगीर शहर शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेले शहर असून आपल्या भागात मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज वस्तीगृह असावे,म्हणून आग्रही मागणी केली असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.