उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सुषमा स्वराज पुरस्कार देऊन सन्मान
लातूर (दयानंद स्वामी ) : महिला आज कुठेच मागे नाहीत विविध क्षेत्रात महिलांनी मोठी झेप घेतली असून पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्या पुढे जाऊन काम करत आहेत. राज्यातील मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर केल्या असून महिलांना मानसन्मान देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, उद्योग, व्यवसाय, नोकरी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते सुषमा स्वराज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लातूर येथील भाजपाच्या संवाद या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे, जिल्हा उपाध्यक्ष ललिता कांबळे, कार्यक्रमाच्या संयोजिका सुरेखा पुरी, जिल्हा संयोजिका संगीता पाटील, भाजपा महिला आघाडी रेणापूर तालुकाध्यक्ष अनुसया फड, लातूर तालुकाध्यक्ष उषाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुषमा स्वराज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेल्या महिलांचे अभिनंदन करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, महिला कर्तत्वान असतात पुरुषापेक्षा अधिक नियमाने आणि शिस्तीने काम करतात त्यांना जर संधी मिळाली तर मिळालेल्या संधीचे निश्चितच सोनं करून दाखवतात आई पत्नी बायको बहीण सासू सून या सर्वच भूमिका निभवणारी महिलाच भारतीय संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम करते.
गोरगरीब सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना जाहीर केल्या असल्याचे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, सर्वच महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत, महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्य सुविधा, बचत गटांना प्रोत्साहन मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये ती मुलगी पहिलीला गेल्यास चार हजार, सहावीला सहा हजार, अकरावीत गेल्यास आठ हजार आणि मुलीचे अठरा वय पूर्ण झाल्यास तब्बल ७५ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे बोलून दाखविले. यावेळी श्रीमती रेखाताई तरडे यांनी भाजपा महिला मोर्चाच्या कामाची माहिती देऊन महिलाच्या कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते रत्नमाला सूर्यवंशी (ग्रामसेविका), मीना गुंडरे (तलाठी), वैजंता इरकल (बचत गट सहयोगी), मनीषा सूर्यवंशी उषा मुक्ता (आशा कार्यकर्ती), शारदा साखरे (प्रशिक्षिका), डॉ. प्रगती पवार, डॉ. प्रिया पुरी, डॉ. सगिरा पठाण सिद्दिकी, डॉ. किरण कुमठेकर (उत्कृष्ट कार्य), सुरेखा चंदिले (शिक्षिका), लता बनसोडे (उत्कृष्ट बचत गट), शबाना सय्यद, मनीषा ओव्हाळ (आशा वर्कर) आदी महिलांचा सुषमा स्वराज पुरस्कार देऊन सन्मान केला यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला.