कोरोना काळात आशा कार्यकर्तीच ईश्वराचे रुप होते – माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : समाजातील तळगाळातील घटकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम आशा कार्यकर्ती ताईंनी केले आहे. एक हजार नागरिकांच्या मागे एक आशाताई असे असून देखील आपले कर्तव्य अतिशय निष्ठेने पार पाडून मागील दोन वर्षाच्या कोरोना सारख्या महामारीत देखील आपण सर्वांनी जीवाची परवा न करता कोरोना काळात केलेले कार्य अविस्मरणीय आहे. कोरोना काळामध्ये आपण एकमेकांपासून दुर होतो. यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर असणारे डॉक्टर मंडळी व त्यांच्या पाठोपाठ आशा कार्यकर्ती होत्या. घरापर्यंत जाऊन औषध गोळ्या देण्याचे काम आशाताईंनी केले, म्हणूनच अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. या महाभयंकर अशा कोरोना सारख्या काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेचे काम केले. आपण आशा कार्यकर्त्यांना ईश्वराचे रुप मानतो,असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजीत उदगीर व जळकोट येथील आशा वर्करच्या ‘आशा दिवस’ निमित्त बोलत होते.या कार्यक्रमास उदगीर पं.स.चे माजी सभापती प्रा. शिवाजीराव मुळे,माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचऒ) डाॅ.हनुमंत वडगावे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जळकोट तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील, शहराध्यक्ष समीर शेख, उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, गटविकास अधिकारी महेश सुळे, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार , आशा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव देशमुख, व्यंकटराव पाटील, प्रकाश हैबतपुरे, डाॅ.प्रशांत कापसे, डाॅ.संजय पवार, डाॅ.हरेश्वर सुळे, प्रा.संजय मठपती, आशा जिल्हा समन्वयक संगीता डावरे, डाॅ.स्वाती सोनवणे, डाॅ.लोहकरे, माया बिरादार, शोभा भद्रे, सुनिता येलमटे, अनिता पाटील, नीरा दाडगे, पार्वती मोरतळे, रुक्मिणी फड, देवणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी सांगितले की, आशा सेविकामुळे माता मृत्यू व बाल मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. येत्या काळात आपण काम करणा-या व्यक्तीच्या पाठीमागे आपण खंबीर पणे उभे रहावे असे आवाहनही आ.संजय बनसोडे यांनी केले.