रामेश्वर येथील कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन,कुस्ती खेळाडूंनी ऑलम्पिकमध्ये चमक दाखवावी – शांताराम जाधव

रामेश्वर येथील कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन,कुस्ती खेळाडूंनी ऑलम्पिकमध्ये चमक दाखवावी - शांताराम जाधव

लातूर (एल.पी.उगीले) : कुस्ती खेळाडूंनी मनामध्ये जिद्द, सातत्य आणि जिंकण्याचे स्वप्न बाळगल्यास यश नक्कीच मिळेल. महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी झाल्यानंतर खेळाडुंनी ऑलम्पिकमध्ये आपली चमक दाखवून भारताचे नाव करावे. असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार प्राप्त शांताराम जाधव यांनी व्यक्त केले.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती-राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा २०२३’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर, हिंद केसरी दिनानाथ सिंग, आमदार रमेशअप्पा कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, क्रीडा संचालक डॉ. पी.जी. धनवे आणि राजेश कराड उपस्थित होते.
शांताराम जाधव म्हणाले, समाजात एकता आणि संगोपणाचे कार्य कुस्ती खेळ करीत आहे. यातील खेळाडूंनी सदैव जिद्द बाळगून खेळ खेळत रहावे. १० वेळा जरी हारलो तरी चालेल परंतू एक वेळा जिंकला तर या देशाचे नाव उज्वल होईल. राजर्षी शाहू महाराजानंतर कुस्ती खेळाला जगविण्याचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड करीत आहेत. त्यांनी शिक्षणासोबतच खेळाडूंवर प्रेम करीत आहेत. मी स्वतः झोपडपट्टीतला खेळाडू राष्ट्रभवनापर्यंत पोहचू शकतो. तशी जिद्द बाळगून तुम्ही खेळात वाटचाल करावी.
दिनानाथ सिंग म्हणाले, महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कुस्ती खेळात न थांबता पुढील तयारी करावी. वर्तमान काळात कुस्ती खेळाडूंच्या घरातील आर्थिक परिस्थिती थोडी खराब आहे. त्यासाठी राज्यसरकारने त्याकडे लक्ष दयावे. त्यांना मिळणार्‍या मानधनात वृध्दि करावी. शिक्षण आणि कुस्ती खेळाला आश्रय देणारे डॉ. विश्वनाथ कराड हे पुनम का चांद आहेत. ते सदैव खेळाडूंना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, कुस्ती खेळाडूसंदर्भात महाराष्ट्र सरकारने सकारात्मक पावले उचलून त्यांना मान व पद दयावे. तसेच महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी पहलवानांनी आपली मोठी झेप घेण्याची क्षमता निर्माण करावी. तसेच ऑलम्पिकमध्ये जाऊन भारताचे नाव रोशन करावे. खेळाडूंनी स्वधर्म, स्वत्व आणि स्वाभिमान बाळगावा. आज या कुस्ती फडाला देशातील ११ हिंद केसरींनी आशीर्वाद दिला आहे. सर्वांनी भारतीय संस्कृती लक्षात ठेवावी. कारण संपूर्ण जग भारताकडे पाहत आहेत. स्वामी विवेकांनद यांनी सांगितल्यानुसार भारत माता २१व्या शतकात विश्व गुरू म्हणून उदयास येईल व शांतीचा मार्ग दाखवेल.
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, खेड्यातून कुस्ती जोपासली जाऊन राष्ट्रीय स्तरावरील पैलवान निर्माण व्हावे यासाठी डॉ. कराड हे अथक परिश्रम घेत आहेत. आज कुस्तीसाठी संपूर्ण राज्यातून २३० मल्ल आले आहेत. रामेश्वराचे भाग्य आहे, देशातील सर्व श्रेष्ठ पैलवान येथे येऊन त्यांनी कुस्ती फडाला आशीर्वाद दिले आहेत. दादांनी ही कुस्तीची शुरूआत केली. आज त्याचे स्वरूप वाढले आहे. चंद्रहार पाटील यांनी गदेची खरी किंमत काय आहे हे आज येथे आल्यावर कळले असे सांगितले. तसेच विष्णू जोशीलकर यांनी लाल मातीतील कुस्तीसाठी डॉ. कराड यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
शुभारंभाची कुस्ती अनिकेत खंदारे आणि इंद्रजित बोडरे यांच्यात झाली. त्यामध्ये एमआयटी माईर्स, पुणेचे इंद्रिजित बोडरे विजयी झाला. तसेच, स्वप्नील काशिद आणि करण देवकर यांच्यातही शुभारंभाची कुस्ती झाली. यामध्ये सोलापूर येथील स्वनिल काशिद विजयी झाला. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो मल्लांनी भाग घेतला आहे. प्रा. गोविंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विलास कथुरे यांनी आभार मानले

About The Author