एमएसईबीचे इंजिनिअर सर्जे भ्रष्टाचार करणार ?
तर अँटी करप्शनचे रेजितवाड नाहीच सोडणार !!!
लातूर(एल.पी.उगीले) : केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन आधुनिकतेचा फायदा घेत शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला जावा. या उद्देशाने नवीन नवीन प्रकल्प सुरू करत आहेत. अगदी ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील सोलार योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. पुनर्वापर करणाऱ्या ऊर्जेतून देशाचे कल्याण व्हावे. असा यामागचा उद्देश असल्याने, सोलार इन्स्टॉलेशनच्या व्यवसायात असलेल्या लोकांना मार्गदर्शन करून ग्राहकांना हे प्रोजेक्ट बसवण्यासाठी प्रवर्त करण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन करावे, म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काही व्यावसायिक सोलार इन्स्टॉलेशनचा व्यवसाय करून राष्ट्रहित साधत असतानाच, झारीतले शुक्राचार्य बनलेल्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याकडून त्यांना त्रासही दिला जातो आहे. असे चित्र समोर आले आहे. काही सुशिक्षित बेकार, बेरोजगार आपल्याला रोजगार मिळावा आणि स्वार्थ व परमार्थ साधावा, या भावनेने सोलार इन्स्टॉलेशनचा व्यवसाय करत आहेत. मात्र अशा लोकांना विद्युत मंडळातील अधिकाऱ्यांनी साथ देण्याऐवजी भ्रष्ट प्रवृत्तीने लुबाडण्याचे तंत्र सुरू केल्याने, शासनाच्या योजनेचा बोजवारा उडत आहे. इतकेच नाही तर अशा भ्रष्ट प्रवृत्तीमुळे देशाच्या प्रगतीला आळा बसला जात आहे. एका अर्थाने अशा देशद्रोही प्रवृत्तीला आळा घालण्याचे ठरवूनच एका तरुणाने आपल्या व्यवसायात अडथळा ठरणाऱ्या एम एस ई बी च्या सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या गोविंद तुकाराम सर्जे यांनी केलेली लाचेची मागणी पूर्ण न करता या प्रवृत्तीलाच ठेचून काढले पाहिजे, अशा स्वाभिमानी वृत्तीने त्यांनी दृढ संकल्प केला, परिणामतः एम एस ई बी च्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता यांची पिळवणूक करणारे आणि आपल्या नोकरीच्या क्षेत्रात कुख्यात असलेले सहाय्यक अभियंता म्हणून लातूर शहर क्रमांक पाच महावितरण कार्यालय लातूर येथे वर्ग दोन पदावर कार्यरत असलेले गोविंद तुकाराम सर्जे (वय 46 वर्ष) यांच्या (जाच जुलमातून सुटका व्हावी म्हणून) भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालावा म्हणून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला.
गेल्या काही दिवसापासून लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जन सामान्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केल्यामुळे लाचखोर प्रवृत्तीच्या अधिकारी, कर्मचारी यांना आळा घालणारे कर्तव्य कठोर अधिकारी रेजीतवाड त्यांच्या कर्तबगारिवर विश्वास ठेवून तक्रारदारांनी एम एस ई बी चे सहाय्यक अभियंता गोविंद तुकाराम सर्जे यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली. तक्रारदार यांचा सोलार इन्स्टॉलेशनचा व्यवसाय असून त्यांनी हाती घेतलेल्या ग्राहकांच्या प्रोजेक्ट करिता तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र (अर्थात टेक्निकल फिजिबिलिटी) देण्यासाठी तक्रारदार यांना महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद सर्जे यांनी तीस हजाराची लाच मागितली. मात्र तडजोडी अंती ही लाचेची रक्कम 22 हजारावर निश्चित झाली. ही लाच त्यांनी पंचा समक्ष मागणी केली. याची पडताळणी 10 मार्च, 14 मार्च आणि 15 मार्च या दिवशी करण्यात आली. मागणी केलेल्या लाचेच्या रकमे सह तक्रारदार यांनी पंचायत समक्ष लोकसेवक गोविंद तुकाराम सर्जे यांच्या कार्यालयात जाऊन भेटले असता, आरोपी लोकसेवक गोविंद सर्जे यांनी मागितलेली लाचेची रक्कम 22 हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारली. आरोपी लोकसेवक गोविंद सर्जे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून, त्यांच्यावर गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पर्यवेक्षणीय अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड त्यांच्या सल्ल्यानुसार पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर आणि पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या पथकाने सदरील सापळा यशस्वी केला आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही दलाल, खाजगी व्यक्ती यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, शासनाने ठरवून दिलेली कायदेशीर फी (शुल्क) या व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याशी संपर्क करावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी, कर्मचारी यांना धडा शिकवला जाईल. त्यासाठी निर्भीडपणे नागरिकांनी तक्रार नोंदवावी. असे पंडित रेजितवाड यांनी आवाहन केले आहे.
चौकट………
रेजीत वाढ यांच्यामुळे विश्वासार्हता वाढली!!
सर्वसामान्य नागरिक आजकाल या भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अगदी बिनधास्तपणे लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्यासाठी येऊ लागले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पंडित रेजितवाड यांनी जनमानसाचा विश्वास संपादन केला आहे. अशी चर्चा जिल्ह्यात सर्वत्र चालू असून अशा धडक मोहिमेमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या हरामखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निश्चित घडा मिळेल, असा विश्वास आता जनसामान्यातून बोलून दाखवला जातो आहे.