वैदीक काळापासूनच स्त्री सन्मान ही आपली संस्कृती- डॉ. शिल्पा दिदी
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा महिला शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब उदगीरचे अध्यक्ष रामेश्वर निटूरे होते. मंचावर सचिव व्यंकटराव कणसे, प्रमुख अतिथी म्हणून हैद्राबाद येथील सनातन धर्म संस्था उपदेशक डॉ. शिल्पा दिदी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. डॉ. अर्चना मोरे, डॉ. नितीन गुरूडे, प्रमोद शेटकार, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. शिल्पा दीदी यांनी, वैदीक काळापासूनच स्त्री सन्मान ही आपली संस्कृती आहे. पण ब्रिटिशांनी आपल्या संस्कृतीचा व शिकवणीचा र्हास करून त्यांची शिक्षण पध्दती रूजवण्याचा प्रयत्न केला. ज्या देशात आदीशक्तीची पुजा होते, तेथे स्त्रीशक्तीचे सदैव पुजन केले जाते. असे मत व्यक्त केले. तर प्रा. डॉ. अर्चना मोरे यांनी, आदी काळापासून स्त्री जीवनाचा संपूर्णपट आपल्या वक्तव्यातून मांडला.
या सोहळ्यात अश्विनी कासनाळे (राजकारण), डॉ. प्राजक्ता गुरुडे (स्त्री आरोग्य), चंद्रकला बिरादार (पर्यावरण), सरस्वती संतपुरे (कलाक्षेत्र) मीरा अनंतवाळ (सामाजिक कार्य) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी महिला शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मंगला विश्वनाथे व प्रा. अश्विनी देशमुख यांनी केले. प्रास्ताविक महानंदा सोनटक्के यांनी केले. आभार सुनीता मदनुरे यांनी मानले. कार्यक्रमास विशाल जैन, संतोष फुलारी, प्रा. अन्नपूर्णा मुस्तादर, रविंद्र हसरगुंडे, गजानन चिद्रेवार, डॉ. सुधीर जाधव, डॉ. सुलोचना येरोळकर, संदीप मोदी, चारुशीला पाटील सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.