माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या अनुभवाचा राज्य साखर संघाला निश्चित फायदा – विवेक जाधव
उदगीर (एल. पी. उगीले) : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तज्ञ संचालक म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री, सहकार महर्षी सहकारी साखर कारखानदारीतील प्रदीर्घ अनुभव असलेले विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपरावजी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल राज्यातील विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधीनी, सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व दिलीपराव देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची साखर संघाच्या तज्ञ संचालक पदी निवड म्हणजे त्यांच्या प्रचंड अनुभवाचा फायदा साखर संघाला होण्यासाठीच आहे. राज्य सहकारी साखर संघ हा महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारा संघ आहे. या सोबतच कारखान्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कामगार, कर्मचारी यासाठी शासनाच्या पातळीवर प्रशासना सोबत कारखान्याची बाजू मांडून, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याचे काम या राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून होत असते. राज्यातून तज्ञ संचालक पदी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी अर्थ राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न निकाली काढून सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मांजरा परिवाराच्या वतीने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे कार्य सुरू आहे. अशी माहिती गंगापूर, भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची ही निवड सार्थ आणि योग्य आहे. त्यांचा सहकार व साखर कारखानदारी मध्ये तब्बल 40 वर्षाहून अधिक कार्यकाळाचा अनुभव आणि सहकार क्षेत्रामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना परिवारातील सर्व नऊ साखर कारखाने यांचा व्यवहार पारदर्शक ठेवून अत्यंत चांगल्या पद्धतीने विकासाचा एक एक टप्पा ते गाठत आहेत. विशेष बाब म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात अव्वल ठेवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक सहकार क्षेत्रातील संस्था अव्वल स्थानावर आहेत, त्या सर्व संस्थांना योग्य मार्गदर्शन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचेच असल्याने त्यांची ही निवड म्हणजे लातूरच्या मान सन्मानामध्ये वाढ असून, सहकार क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असेही विवेक पंडितराव जाधव यांनी सांगितले.
