डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डिजिटल बोर्डचे अनावरण व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल गायकवाड यांचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी) : सबंध भारत देशात कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. मागील दीड वर्षापासून आपण या महामारीचा सामना करत आहोत, मागच्या वर्षी सुद्धा एप्रिल महिन्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती होती म्हणून मागील वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकाने आपापल्या घरीच साजरी करुन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले होते. यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती आहे याचे भान ठेवून ज्या महामानवाने दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, बहुजन समाजाला जातीच्या धर्माच्या विळख्यातून बाहेर काढले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या आणि सबंध भारत देश ज्या युगपुरुषाच्या राज्यघटनेवर चालतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा आदर करत नाविन्यपूर्ण आणि अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल शिवाजी गायकवाड आणि जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केला आहे.
प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय जल्लोषात, आनंदात, उत्साहात, ताल-गजराच्या निनादात आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करुन केली जाते. या प्रसंगी विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सद्यस्थिती लक्षात घेता नाविन्यपूर्ण आणि कायमस्वरुपी प्रत्येक भीम सैनिकाच्या स्मरणात राहील अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे 3D डिजीटल अक्षरातील बोर्ड बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या वरील बाजूस उभे करुन दि. 13 एप्रील रोजी रात्री ठीक १२ वाजता सोशल मीडियाचा वापर करून थेट प्रक्षेपण पद्धतीने सगळ्यांच्या उपस्थितीत अनावरण कण्यात येणार आहे. मागील एक वर्षापासून आपण सर्वजण कोरोना महामारीचा सामना करत आहोत, कोरोनाची पहिली लाट ही सर्वसामान्यांसाठी अतिशय त्रासदायक होती. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार नाहीसे झाले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक लोकांच्या हाताला कसल्याही प्रकारचे काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणून कोणत्याही सर्वसामान्य माणसाकडून कसलीही सक्तीची वर्गणी गोळा न करता स्वेच्छेने जे वर्गणी देऊ इच्छितात त्यांनी ऑनलाइन वर्गणी द्यावी. असे नम्र अवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक लोकांनी वर्गणी दिली.
यावर्षी आपतकालीन परिस्थितीमुळे पुरेशी वर्गणी जमा होऊ शकली नाही पण जेवढी काही वर्गणी जमा झालेली आहे त्या वर्गणीतून प्रतिवर्षाप्रमाणे खर्च न करता अनावश्यक खर्च करण्याचे टाळून लाखो बहुजनांचे शक्तीस्थळ असलेल्या आंबेडकर पार्क येथील पुतळ्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यात भर पडावी असा प्रामाणिक विचार करुन जमा निधीतून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या वरील बाजूस आणि दुरुनही स्पष्ट दिसावा अशा पद्धतीने थ्रीडी डिजिटल बोर्ड उभा करुन या कोरोनाच्या काळातील निर्बंध पाळत एक आगळी वेगळी अनोखी मानवंदना देऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
त्याचबरोबर सध्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन लातूर जिल्ह्याचा रक्तपेढीतील शिल्लक रक्त साठ्याचा विचार करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचा संकल्प सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष निखिल गायकवाड व जयंती उत्सव समितीचे इतर पदाधिकारी यांनी केले आहे.