विश्वभुषण,भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आभाळाला गवसनी घालणार्या व्यक्तीमत्वाची महती
130 व्या जयंती निमित्त आमच्या वाचकासाठी सादर..कृपया प्रतिक्रिया कळवाव्यात..
एल.पी.उगीले,करिता : पोलिस फ्लॅश न्युज
महामानव
दीन दलितांचे कैवारी म्हणजे बाबासाहेब!!
माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब!!
गुलाम म्हणून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे बाबासाहेब!!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच बाबासाहेब!!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. वंचित समाजाचे तारणहार असलेल्या बाबासाहेबांचा शिक्षणविषयक दृष्टिकोण खूप प्रगल्भ आणि आधुनिक होता. ते स्वतः प्रतिकूल परिस्थितीतही खूप शिकले आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याचा जणू त्यांनी आदर्श घालून दिला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य आणि हक्कांची जाणीव होते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पेईल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही” असे ते आपल्या समाजबांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून ते शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. “प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत”. शिक्षण प्राप्त झाल्याने प्रत्येक व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. शाळेमध्ये मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवले पाहिजेत. शिक्षण हे समाजहितार्थ, सामाजिकबांधिलकी, कर्तव्य पार पाडावीत असे असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे ते मानीत. डॉक्टर आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या आचार व विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते मानत व जातीभेदाच्या विरोधात ते होते. बाबासाहेबांना उच्च शिक्षणाद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मानवी मुल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. त्यांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता. सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे. शिक्षक हा शालेय असो, महाविद्यालयीन असो किंवा विद्यापीठे असो त्याचे कर्तृत्व उत्तुंग आणि विद्यार्थ्यांना अनुकरणीय वाटले पाहिजे. शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे, असे ते म्हणायचे.
बाबासाहेब असे महामानव होते. ज्यांनी ग्रंथालयासाठी बंगला बांधला. बाबासाहेब एका परीक्षेत पास झाल्यानंतर त्यांचा गौरव करण्यासाठी चाळीतील लोकांनी सत्कार ठेवला. व त्यांना गौतम बुद्ध यांचे चरित्र भेट म्हणून देण्यांत आले. ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी गौतम बुद्धांना आपले गुरु मानले. नंतर सामाजिक क्षेत्रात ते बौद्ध धर्माकडे वळून धर्मांतरचा इतिहास घडला. एक छोटंसं पुस्तक कोणाच्या जीवनात केव्हा परिवर्तन घडवेल हे सांगता येऊ शकत नाही. बाबासाहेब एकदा म्हणाले होते “तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल”.
खरंच काय विचार होते? असेच वेड प्रत्येक विद्यार्थ्याला लागले पाहिजे असे माझे मत आहे. पुस्तकांची आवड ही त्यांची कधीही न संपणारी तृष्णा! पुस्तक प्रेम अपार होतं व ते त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनून आयुष्यभर त्यांचे सोबती म्हणूनच राहिले. याचा परिणाम असा झाला की, त्यांची स्मरणशक्ती अफाट बनली. जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 दिवस खोलीला बाहेरून कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतले होते. त्या वेळी त्यांना एका लहान खिडकीतून चहा व जेवणाची व्यवस्था केली होती. या प्रसंगातून समजते त्यांच्या लेखन व वाचनाची एकाग्रता किती पराकोटीची होती. एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती. पण ती बोट दुर्दैवाने बुडाली तेव्हा बाबासाहेब त्या पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते. त्यांचे आपल्या पुस्तकांवर पराकोटीचं प्रेम होतं. बाबासाहेबांनी जगातल्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचा अभ्यास केला. लहानपणापासूनच वाचनाने ते “प्रज्ञासूर्य” होऊन जागतिक कीर्तीचे महापुरुष झाले.
वृत्तपत्रांतबद्दल तर ते असे म्हणत की, “पंखाशिवाय पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्रांची नितांत गरज असते”. अशा या महामानवाचे महान कार्य व डॉक्टर बाबासाहेब म्हणजे या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. परंतु आज आपण सर्वांनी त्यांच्या या कार्याचा वारसा सदोदित पुढे नेण्याचे काम केलेच पाहिजे. श्रेष्ठ चिंतक, तेजस्वी लेखक आणि भारताचे पहिले कायदेमंत्री भारतरत्न डॉक्टरांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधाननिर्मितीत सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या मते सर्वांनी
“शिका!संघटित व्हा! संघर्ष करा!”.
“शाळा ही सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे”. “सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे”. “अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही”.
“जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो”.
“मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते”.
आंबेडकरांना वाचनाचा अतिशय छंद होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही असे त्यांना वाटे. मृत्यूसमयी त्यांच्या ग्रंथालयात सुमारे 25 हजार दुर्मिळ ग्रंथ होते. आंबेडकरांचे ग्रंथ लेखन इंग्रजी भाषेतीलच आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते प्रत्येक क्षेत्रात पारंगत होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल अशा नेतृत्वाखाली त्यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. डॉक्टर आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्कांप्रती जागी केले ते नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली.
अशा या महामानवाच्या कार्याला व स्मृतींना वंदन करून एवढंच म्हणेन
“शिल्पकार ते घटनेचे, उद्धारक ते उपेक्षितांचे, विरोधक ते वर्णभेदांचे भारतरत्न ते या देशांचे!!
“दूत ते शांतीचे, प्रचारक ते समतेचे, प्रसारक ते धम्माचे, भारतरत्न ते देशाचे!!
“सागर ते ज्ञानाचे, पंडित ते कायद्याचे, अभिमान ते भारतीयांचे, भारतरत्न ते या देशाचे!!!
अशा या महामानवाच्या कार्याला व स्मृतींना वंदन करून एवढंच म्हणेन
“शिल्पकार ते घटनेचे, उद्धारक ते उपेक्षितांचे, विरोधक ते वर्णभेदांचे, भारतरत्न ते या देशांचे”.
“दूत ते शांतीचे, प्रचारक ते समतेचे, प्रसारक ते धम्माचे, भारतरत्न ते देशाचे”.
“सागर ते ज्ञानाचे, पंडित ते कायद्याचे, अभिमान ते भारतीयांचे, भारतरत्न ते या देशाचे!!!
श्री. पटवारी रामेश्वर महादेव सहशिक्षक,
सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विदयालय उदगीर.