डॉ. मायाताई कुलकर्णी यांना राज्यस्तरीय
फेस्कॉम महिला भूषण पुरस्कार प्रदान

डॉ. मायाताई कुलकर्णी यांना राज्यस्तरीय<br>फेस्कॉम महिला भूषण पुरस्कार प्रदान

लातूर (एल.पी.उगीले) : लातूरातील ममता हॉस्पिटलच्या संस्थापिका व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या ,डॉ. मायाताई मधुकरराव कुलकर्णी यांना राज्यस्तरीय फेस्कॉम महिला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ( फेस्कॉम )चे पाचवे राज्यस्तरीय महिला अधिवेशन आणि मनोहारी मनोयुवा आनंद मेळाव्याचे नुकतेच नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर व नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनात डॉ. मायाताई कुलकर्णी यांना गिरीश महाजन यांच्या हस्ते राज्यस्तरीय फेस्कॉम महिला भूषण पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते .
यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे ,अशोक तेरकर, आ. बालाजी कल्याणकर, डॉ. तुषार राठोड ,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठांना मान-सन्मानाची वागणूक देणे ही आपली संस्कृती असून ती आपण जोपासली पाहिजे. यासाठी शासन संवेदनशिल आहे. येत्या काळात शासनातर्फे महिला व जेष्ठांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल.शासनातर्फे जेष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे, ते-ते देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
राज्यात अंदाजे १ कोटी ३६ लाख ज्येष्ठांची संख्या असून ज्येष्ठांना आवश्यक त्या मुलभूत गरजा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रवास आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये मोफत प्रवासाची सोय असून, महिलांनाही प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. येत्या काळात महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी ६५ वर्षाच्यावरील नागरिकांना वेगळी ओपीडीची व्यवस्था करण्याचा विचार असून ज्येष्ठांना नियमित तपासण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित ज्येष्ठांना सांगितले.
शासनाच्यावतीने सध्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोहिम सुरु आहे. या आजारात महिलांनी पुढाकार घेवून आपली तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन वेळीच निदान होवून उपचार मिळाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यासाठी ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. महिलांनी या मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
फेस्कामच्यावतीने वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत डॉ. मायाताई कुलकर्णी यांना फेस्काम महिला भूषण पुरस्कार व अण्णासाहेब टेकाळे यांना जीवन गौरव पुरस्कार पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी ज्येष्ठांना शासनातर्फे दिलेल्या सुविधांबाबत आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!