उषा कांबळे यांची काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर येथील काँग्रेसच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांच्या एकनिष्ठ पक्ष कार्याची दखल घेत, पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश पातळीवर कार्य करण्याची संधी त्यांना दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी उषाताई कांबळे यांना निवडीचे पत्र देऊन, आपण काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या समोर असलेली उद्दिष्ट व अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती नेटा डिसोझाजी यांच्या नेतृत्वाखाली व सरचिटणीस अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रभारी श्रीमती ममता भूपेशची यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाराष्ट्रात सक्रिय कार्य करावे. आणि आपल्या कर्तृत्वाने दैदिप्यमान कामगिरी करून दाखवावी, अशी अपेक्षा या निवड पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
या निवडीच्या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्रीमती उषा कांबळे यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर कोणती जबाबदारी सोपवली असेल, तेव्हा तेव्हा ती जबाबदारी आपण खंबीरपणे यशस्वी करून दाखवली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाचे काम असेल, किंवा काँग्रेस पक्षाच्या प्रचार आणि प्रसारा सोबतच संघटन बांधणीचे काम असेल, आपण सतत एकनिष्ठ राहून पक्षाची सेवा केली आहे. आपल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे सर्व सहकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मध्ये काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने आपण विशेष प्रयत्न करू, असे सांगितले.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पक्षश्रेष्ठींनी मोठ्या अपेक्षेने आपल्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी सार्थ करून दाखवण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही. सद्यस्थितीत पक्ष अडचणीत असला तरी लवकरच पक्षाला गत वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे कार्य करताना, सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देताना, आपल्याला मनस्वी आनंद होतो. त्यामुळे राजकारणात सक्रिय होऊन काम करताना उत्साह कायम राहतो, असेही त्यांनी सांगितले.
