पानगाव येथील चैत्यभूमी स्मारकासाठी 17 कोटी 53 लाखाचा देती द्या – आ.रमेशआप्पा कराड
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मौजे पानगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारकास महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करून या परिसराच्या विकास कामासाठी 17 कोटी 53 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रहाची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन लातूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य रमेश आप्पा कराड यांनी केली आहे.
रेणापुर तालुक्यातील मौजे पानगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश असल्याने या गावात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लातूर जिल्हा अथवा मराठवाड्यातूनच नव्हे तर राज्यभरातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी सातत्याने मोठ्या संख्येने पानगाव येथे येत असतात. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पानगावच्या या चैत्यभूमी स्मारकास तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यात येत असल्याची विधानभवनात घोषणा केली आहे. पानगाव येथील चैत्यभूमी परिसरात अनेक सुविधाचा अभाव आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. चैत्यभूमी स्मारक परिसराला जोडणारे रस्ते, भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, वाहनतळ अधिक मूलभूत सुविधा करणे अत्यंत गरजेचे आहे.
पानगाव येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी परिसर विकासासाठी 17 कोटी 53 लक्ष रुपयाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा.

अशी आग्रहाची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे. पानगाव येथील चैत्यभूमी परिसराचा सर्वांगीण विकासासाठी निश्चितचपणे भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आश्वस्त केले आहे.
