जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सक्रीय क्षयरुग्णांना पौष्टिक आहार कीटचे वितरण
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यातील सक्रीय क्षयरुग्णांना पौष्टीक आहाराचे वितरण करण्यासाठी ‘निक्षय मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सक्रीय क्षयरुग्णांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते पौष्टिक आहार कीटचे वितरण करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतिश हरिदास, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मापारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम पवार, गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप इगे, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. संजय तेलंग यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहिम ही 8 मार्च ते 21 मार्च या कालावधीत राबविण्यात आली होती. त्यामध्ये आढळणाऱ्या क्षय रुग्णावर मोफत औषधोपचार देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत शोध मोहिमे दरम्यान आढळणाऱ्या सर्व क्षयरुग्णाचे उपचार यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, मदत करण्यासाठी स्वंयसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये अतिरिक्त पोषण आहार मिळावे, यासाठी ‘निक्षय मित्र’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 106 निक्षय मित्रांच्या माध्यमातून 300 पोषण आहार कीटचे वितरण करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्वच सक्रीय क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वितरीत करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यामध्ये क्षयरुग्णांच्या सान्निध्यातील व्यक्तीना टीबी प्रतिबंधक उपचार चालू करण्यात येते. जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये क्षयरोग होणार नाही. क्षय रुग्णांच्या सानिध्यातील व्यक्तीने तपासणी करुन घेऊन क्षयरोग प्रतिबंधक उपचार घ्यावेत, असे आवाहन गोयल यांनी केले.अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 10 पोषण आहार कीट देवून ‘निक्षय मित्र’ अभियानात सहभाग नोंदविला. निक्षय मित्र म्हणून मागील महिन्यापासून सक्रिय सहभाग नोंदविण्याऱ्या लातूर येथील राज प्रतिष्ठान, लातूरचे डॉ. हषवर्धन राऊत तसेच शुभम पॅथॉलॉजीचे संचालक डॉ. अभिजीत आचार्य यांचा टीबी प्रतिबंधक तपासणीकरीता केलेल्या सहकार्या बद्यल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले.
