आवड,नियोजन आणि परिश्रम हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली – आयएएस जगताप
उदगीर(एल.पी.उगीले) : महाराष्ट्रात खूप विद्यार्थी गुणवंत आहेत, पण अनेक विद्यार्थी योग्य असे नियोजन करत नाहीत.कोणीतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करते म्हणून करू नका. त्या क्षेत्रात पहिल्यांदा आवड आहे का? ते पाहायला हवं. नुसतं आवड असूनही चालत नाही, तर अथक परिश्रम करणे गरजेचे आहे.हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली असल्याचे विचार देशातील सर्वात तरुण महिला आयएएस अधिकारी कु.नितीशा जगताप यांनी मांडले.
येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने ध्यास यशाचा या उपक्रमांतर्गत आभासी पद्धतीने आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आयएएस अधिकारी कु.नितीशा संजय अश्विनी जगताप यांनी गुंफले. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर व उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय समितीतील प्रा.जे.डी.संपाळे यांनी करून दिला.पुढे बोलताना कु.नितीशा जगताप म्हणाल्या, माझ्या यशाच्या जडणघडणीत कुटुंबाचे, फर्ग्युसन कॉलेज व युनिक अकॅडमीचे फार मोठे योगदान आहे. त्यातल्या त्यात सुरुवाती पासूनचं कुटुंबामुळे मला मानसिक, भावनिक व आर्थिक आधार मिळत गेला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दर्जेदार साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. दररोज वर्तमानपत्र वाचणे तर अत्यंत गरजेचे आहे. छोट्या छोट्या शंका असतील, तर शिक्षकांना व मार्गदर्शकांना विचारून घेतले पाहिजेत. कारण आपल्या संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच महाविद्यालयात जे काही क्रिएटिव्ह कार्यक्रम होतात, त्यात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.त्याचा फायदा जीवनात कायमच होत असतो.स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय प्रश्नाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे स्थानिक प्रश्नाला देखील तितकेच महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी सूक्ष्मपणे करावी लागते.येथे भाषेचे फारसे बंधन नाही. विद्यार्थ्यांनी प्रयत्न अवश्य केले पाहिजे, पण यश नाही मिळाले तर नाराज होता कामा नये. सकारात्मकता उरी बाळगून तयारी करावी. यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव कथन करीत जवळपास एक तास विद्यार्थ्यांशी संवाद साधले. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नितीशाचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन अंतर्मुख करणारे आहे. अशा यशस्वी अधिकाऱ्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
आभासी पद्धतीने आयोजित कार्यक्रमास शंभर ते दीडशे श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मोठया प्रमाणात उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे प्रमुख डॉ.एल.के.उलगडे व समितीतील सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा.मनोहर भालके तर आभार डॉ.म.ई.तंगावार यांनी मानले.
