शेती पंपाला दिवसा वीज द्या – मनसेची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी आवश्यक असणारी शेती पंपाची वीज रात्रपाळीला दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यातून शेतकऱ्यांसोबत विविध दुर्घटना घडवून त्यात शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागतात. अशी एक घटना दि.24/02/2023 रोजी मोजे मोरतळवाडी (हाळी) येथील शेतकरी रामराव गणपती तेदेवाड हे पहाटे 4 वाजता उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना शेताच्या बांधाला आग लागलेली दिसणे, ती विजण्यासाठी गेले असतात त्या ठिकाणी विजेची तार तुटून पडलेली असल्यामुळे त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारची दुसरी घटना हळद वाढवणा ता. जळकोट येथील शेतकऱ्यांचे दोन मुले कपिल दहिफळे व प्रमोद दहिफळे हे दोन भावंडे ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात गेली असता, विजेची तार तुटून विजेचा शॉक लागल्याने मृत्यू पावली आहेत. अशा अनेक घटना या परिसरात घडलेल्या आहेत.
अशा घटना वारंवार घडत असून सुद्धा शासन मात्र अशा घटनाकडे दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठीची वीज दिवसाची 12 तास देऊन शेतकऱ्यांच्या जीविताचे रक्षण करावे. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आक्रमक आंदोलन करेल, याचीच सुरुवात म्हणून दि. 3/4/23 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसील कार्यालय उदगीर समोर ” अर्धनग्न ” आंदोलन करून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे, याची नोंद घ्या, असे निवेदन मनसे कडून देण्यात आले आहे. या निवेदनावर शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील , पक्षाचे तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष बाबुराव जाधव , शहराध्यक्ष संतोष भोपळे , तालुका उपाध्यक्ष प्रशांत घोणसे, महाराष्ट्र सैनिक दत्तात्रय कारलेवाड आदींच्या सह्या आहेत.
