शिक्षकभरती चे पवित्र पोर्टल तात्काळ सुरुवात करा – श्रीकांत जाधव कबनुरकर
लातूर (एल.पी.उगीले) : सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती प्रस्तावित आहे.त्यासाठी आयबीपीएस मार्फत शिक्षकांची पात्रता परीक्षा पार पडली आहे.त्या परिक्षेतून पात्र उमेदवारांचीच निवड रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी केली जाते. त्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया करण्यात येते, तेच पवित्र पोर्टल निकाल येऊन आठ दिवस झाले तरी अद्याप सुरुवात करण्यात आले नाही. आणि सदरील पोर्टल चे काम ज्या बेंगलोर येथील कंपनीला देण्यात आले आहे, त्या कंपनीला शासनाच्या वतीने फक्त 50 टक्के रक्कम म्हणजेच 5 लाख रुपये देण्यात आले आहेत. शासनाकडे त्या कंपनीला देण्यासाठी अजून 5 लाख रुपये नाहीत का? असा प्रश्न आज विद्यार्थ्यांना पडला आहे. राहिलेल्या 5 लाखामुळे कंपनीने जर पवित्र पोर्टलचे काम जलद गतीने नाही केले तर ही शिक्षकभरती देखील मागील शिक्षकभरती प्रमाणे 5 वर्ष रेंगाळत राहील. त्यामुळे शासनाने तात्काळ पवित्र पोर्टल सुरुवात करून शिक्षकभरती करण्याची प्रक्रिया सुरुवात करावी. अशी मागणी डि.टी.एड बि.एड स्टुडंट असोसिएशन चे राज्य सरचिटणीस श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल च्या माध्यमातून पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
