विद्यार्थ्यांनी सत्य आणि परिश्रमाची कास धरावी – डॉ. लखोटिया

विद्यार्थ्यांनी सत्य आणि परिश्रमाची कास धरावी - डॉ. लखोटिया

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजातील बदलत चाललेल्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असले तरी, श्रम प्रतिष्ठेची कास धरून सत्य, चिकाटी आणि परिश्रम हे मूल्य जोपासत विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण करावे. कोणतेही पद मोठे नसून, ती व्यक्ती जे कार्यकरते ते कार्य मोठे असते. केलेल्या कार्यावरून व्यक्तीची ओळख होत असते. त्यामुळे आपण करत असलेल्या श्रमाला प्रतिष्ठा द्या. असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक तथा उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष, सोमनाथपूर येथील गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले. ते उदगीरचे उपनगर असलेल्या निडेबन येथील समर्थ पॅरामेडिकल सायन्सेस कॉलेजमध्ये पदवी वितरणाचा सोहळा संपन्न होत असताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी समर्थ पॅरामेडिकल सायन्सेस कॉलेज उभा करणारे विलास धुपे, डॉ. अविज धुपे, प्राचार्य दिनेश पाटील, प्रा. जरगर, स्वामी हिरा, पल्लवी तेलंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्वाती धमणे, पवार क्रांती, मुलुले संचिता, हरणुळे प्रांजली, कांबळे दीक्षा या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय या संस्थेचे कोषाध्यक्ष विलास धूपे यांनी करून दिला.

पुढे बोलताना डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी स्पष्ट केले की, आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये भ्रष्टाचाराचे स्तोम माजले आहे. शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे, असे असले तरीही विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण करण्यासाठी जिज्ञासू वृत्ती ठेवून प्रामाणिकपणे आपले कार्य चालू ठेवावे. शिक्षण क्षेत्र हे आता व्यापारीक्षेत्र झाले आहे, असे दुर्दैवाने नमूद करावे लागते. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीतही काही शिक्षण संस्था आपापल्या परीने प्रमाणिक प्रयत्न करत असल्याचेही चित्र आहे, असेही सांगितले.

याप्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले विद्यार्थी तसेच विविध शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सामाजिक जाणीव जपणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव याप्रसंगी करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सोनवणे प्रशांत, शेख मरियम, चव्हाण पुनम, शेख मुस्कान, पोतदार विठ्ठल, तेजस सोमवंशी, सूर्यवंशी नितेश, प्रज्ञा गवळे, संदीप सूर्यवंशी इत्यादींचा समावेश होता. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविज धुपे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री तथा समाजसेविका सुरेखा गुजलवार यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!