ह.भ.प.डॉ. शरद तेलगाने यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल पी उगिले ) : उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा सामाजिक जाणीवा जपत समाजसेवा करणारे आणि सुसंस्काराचे बीजारोपण करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे डॉ. शरदकुमार तेलगाणे यांचा सत्कार आणि सन्मान रोकडे हनुमान मंदिर येथे उदगीरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर नीटुरे आणि प्रसिद्ध व्यापारी मारमवार सावकार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
डॉ. शरदकुमार तेलगाने हे फक्त समाजसेवाच नाही तर अध्यात्माच्या सोबतच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाज प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती निर्माण करतात. सामाजिक ऐक्य आणि नव्या पिढीसमोर आपण या समाजाचे काही देणे लागतो, ही भावना रुजवण्यासाठी प्रयत्न करतात. उदगीर शहरातील एक यशस्वी डॉक्टर असून देखील ते आपल्या व्यवसायापेक्षा जास्त वेळ सामाजिक कार्यासाठी देतात. या त्यांच्या सामाजिक कार्याची आणि अध्यात्मिक कार्याची दखल घेत, रोकडे हनुमान देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
उदगीर शहरात ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमच्या माध्यमातून डॉ. शरदकुमार तेलगाने हे सामाजिक जाणीव जपत रुग्णसेवा करतात. गोरगरीब जनतेच्या दुःखात सहभागी होतात. त्यामुळे त्यांना गरिबांचा मसीहा असेही म्हणतात. प्रामाणिकपणे रुग्णसेवा देतानाच रुग्णांमध्ये देव पाहणाऱ्या या तज्ञ डॉक्टर बद्दल कित्येक रुग्णांच्या मनामध्ये देवदूताच्या रूपाने हा डॉक्टर आहे, असे भाव पाहायला मिळतात. जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून काम करणाऱ्या या समाजसेवकाचा सत्कार झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे
