अंधासाठी आणि डोळस कार्यकर्त्यांसाठी उदगीरात पहिल्यांदाच स्वयं सिद्धता कार्यशाळेचे आयोजन
उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर येथे उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या अरुणा अभय ओसवाल रिसर्च सेंटर फॉर द ब्लाइंड स्कूल आणि उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय या संस्थेच्या वतीने अंध व्यक्तीसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी 14 व 15 एप्रिल अशा दोन दिवसाची स्वयं सिद्धता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून आपले आयुष्य सुलभ आणि सुकरतेने जगता यावे. यासाठी उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय सतत प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धता कार्यशाळेचे आयोजन असल्याचे या रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी सांगितले.
उदगीर शहरात अशा पद्धतीची कार्यशाळा पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, लातूर, अकोला, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 48 कार्यशाळा आणि मध्य प्रदेशातील बुराहनपुर येथे एक या पद्धतीने 49 स्वय सिद्धता कार्यशाळा संपन्न झाल्या आहेत. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणाचा आणि कार्यशाळेचा खूप उपयोग झाला. अशाच पद्धतीचा उपयोग उदगीर पंचक्रोशीतील अंध व्यक्तींना आणि अंधासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी देखील उपयोगाची ठरेल, या उद्देशाने उदगीर मध्ये स्वयं सिद्धता कार्यशाळेचे आयोजन करावे. अशा पद्धतीची मागणी सतत होत होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय यांच्या वतीने या कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पांढऱ्या काठीची माहिती व त्याचे उपयोग, पांढरी काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव करून घेतला जाईल. त्याचबरोबर अंध व्यक्तींनी इतर ज्ञानेंद्रियाचा वापर सक्षमपणे कसा करावा? याबद्दलची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येईल. स्पर्शज्ञानाने विविध पदार्थ कसे ओळखायचे? हे सर्व प्रशिक्षण देऊन अंध व्यक्तींना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. ते सर्व प्रशिक्षण स्वागत थोरात हे देणार आहेत. तर त्यांना स्वरूपा देशपांडे, ज्या या कार्यशाळेच्या समन्वयक व सहाय्यक प्रशिक्षक आहेत त्या देणार आहेत. या कार्यशाळेसाठी मुंबई येथील वात्सल्य ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले आहे. या दोन्ही दिवशी कार्यशाळा सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. अंधांच्या वैयक्तिक जीवनात अमुलाग्र बदल घडून आणणाऱ्या या स्वय सिद्धता कार्यशाळेत सहभागी होऊन आपल्या जीवनातील अडचणी दूर करून घ्याव्यात, असेही आवाहन डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे. या स्वयं सिद्धता कार्यशाळेसाठी येणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींची निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश मुंडे यांनी दिली आहे. तसेच या कार्यशाळेच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास प्राध्यापक राजकुमार मुक्कावार 99 70 27 38 34 ,प्राध्यापक राजेंद्र चव्हाण 74 98 81 36 13 किंवा प्राध्यापक अजय भालेराव 87 88 52 28 78 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, किंवा अधिक माहिती घ्यावी. असेही आवाहन डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे.
