लाचखोरीचा आरोपी तलाठ्यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

लाचखोरीचा आरोपी तलाठ्यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

मंगळवेढा (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाचखोर प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी धाडसत्र सुरू केले आहे, त्यात एक तलाठी आरोपी सापडला असून त्यास अटक करण्यात आले आहे, 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

याबाबत हाती आलेली माहिती अशी की,सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी आरोपी लोकसेवक (तलाठी) सुरज रंगनाथ नळे याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पंढरपूर जिल्हा सत्रन्यायालयात उभे केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.यातील तक्रारदार यांच्या गट क्र.52 कमलापूर हद्दीतून सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने पाईप लाईनच्या नुकसानीपोटी 1 लाख 43 हजार 794 इतकी रक्कम मंजूर झाली होती. ती रक्कम सदर शेतकर्‍याला देण्यासाठी झीरो कर्मचारी पंकज महादेव चव्हाण (रा.शेलेवाडी) याच्या मार्फत सात हजार रुपये लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात तलाठी अलगद सापडला. प्रथमतः लाच लुचपत प्रतिबंधक पथकास पाहताच रक्कम घेवून तलाठी नळे चार चाकी वाहनासह फरार झाला होता. तपासीक अंमलदार पो.नि.उमेश महाडीक यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन अखेर कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन ताब्यात घेतले होते. दरम्यान आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. आरोपी नळे याने अखेर नांगी टाकत पोलीसा समोर हजर झाल्यावर पोलीसांनी त्याला अटक केली होती.

प्रथमत: नळे याला चार दिवसाची व झीरो कर्मचारी चव्हाण याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. चव्हाण याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्या नंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. तलाठी नळे याला एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली होती. याची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या सहा महिन्यात महसूल मध्ये दोन लाचेची प्रकरणे घडल्याने महसूल खाते बदनाम झाले आहे. लाच प्रकरणातील दोन्हीही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. काही महिन्यापुर्वी तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाकडील पुरवठा निरीक्षक लाच प्रकरणात सापडले होते. शेतकर्‍यांच्या रक्कमा देण्यासाठी टक्केवारी घेतल्याचा शेतकर्‍यांचा आरोप असून तो पैसा शेतकर्‍यांना परत मिळावा, अशी शेतकर्‍यांची मागणी जोर धरीत असून पैसा परत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.

About The Author

error: Content is protected !!