शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धनंजय गुडसूरकर

शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धनंजय गुडसूरकर

उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंडळ ( महाराष्ट्र ) मराठवाडा विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे . येत्या १६ एप्रिल रोजी माहूर येथे हे विभागीय शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे . नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र जाधव यांनी दिली.या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले धनंजय गुडसूरकर हे नामांकित लेखक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत . महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध असून सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या गुडसूरकर यांचा बालसाहित्य, ललित लेखन, समीक्षा लेखन या प्रांतात वावर आहे . श्रमर्षी बाबा आमटे यांच्या कार्यावर 125 व्याख्याने देणाऱ्या गुडसूरकर यांचे साहित्य चळवळीत मोठे योगदान आहे . उदगीर येथील प्रबोधन साहित्य परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून ३० वर्षात त्यांनी साहित्यिक चळवळ राबविली असून शिक्षक विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. कथाकथन ,एकपात्री प्रयोग यामधून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे कार्यवाह राहिलेल्या गुडसूरकर यांचे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातही योगदान राहिले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते सदस्य आहेत. २५ ग्रंथाना त्यांनी प्रस्तावना व पाठराखण लिहीली आहे . नवोदित लेखकांना लिहिते करून त्यांची पुस्तके त्यांनी प्रबोधनच्या व्यासपिठावरून प्रकाशित केली आहेत. जि.प. चा आदर्श शिक्षक पुरस्कार, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार , डॉ. ना . य . डोळे स्मृती पुरस्कार, लोकराज्य शैक्षणिक पुरस्कार, राजीव दीक्षीत स्मृती साहित्य पुरस्कार, बाबा आमटे स्मृती जिव्हाळा कावड पुरस्कार यासह विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या डी. एड अभ्यासकम पुनर्रचना समितीचे ते सदस्य राहिले आहेत . लेखणी आणि वाणीवर प्रभुत्व असणाऱ्या गुडसूरकर यांच्या व्यासंगाची दखल घेऊन त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र जाधव व निमंत्रक रमेश मुनेश्वर यांनी कळविले आहे . गुडसूरकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!