आंतरजातीय विवाह नडला !! पोरीचा बाप तिच्या सासरच्यांशी भिडला!!
लातूर (प्रतिनिधी) : पुरोगामी महाराष्ट्राचा कितीही गवगवा केला जात असला तरी, ते पुरोगामीत्व दिवा घेऊन शोधण्याची वेळ आली आहे. उच्च विद्या विभूषित तरुणींना देखील त्यांच्या जगण्याचा हक्क, त्यांच्या विवाहाचा हक्क त्यांना नाही. मग कुठलीही स्त्री पुरुष समानता? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक पाहता स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा बेंबीच्या देठापासून जरी मारल्या जात असल्या तरी, वास्तविकता तशी आहे का? हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. एका बालीग तरुणीने तेही उच्च विद्याविभूषित तरुणीने आपला जीवनसाथी आपल्या विचाराशी मिळता जुळता आणि आपल्याला समजून घेणार आहे, असे वाटल्यावरून निवडले. मात्र तो वेगळ्या जातीतला आहे, हे भूत डोक्यात घेऊन मुलीच्या माहेरच्या लोकांनी तिचा संसारच उध्वस्त करायचा नाही तर तिच्या सासरच्या लोकांना देखील जिवे मारण्याच्या तयारीने हल्ला करून त्यांना संपून टाकायचा प्रयत्न केल्याची घटना लातूर येथे घडली आहे.
या संदर्भात विष्णू रामभाऊ चामले (वय 47 वर्ष, व्यवसाय शेती, रा. विमल अपार्टमेंट प्लॉट नंबर चार, बाबळगाव रोड लातूर) यांनी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दिली आहे. सदरील फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे आरोपितांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 232 /23 कलम 307, 452, 323, 324, 109, 114, 143, 145, 147, 149 भारतीय दंड विधान संहितेच्या अनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार हे करत आहेत.
विष्णू रामभाऊ चामले यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या जनरल वार्ड बेड नंबर तीन वर उपचार घेत असून जबाब देतो की, मी; माझी पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह लातूर येथे राहतो. मुलीचे व मुलाचे लग्न झालेले आहे. शेती हा व्यवसाय असून त्याच्यावरच उदरनिर्वाह भागवतो.
दि 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी अनुराधा, मुलगी वैष्णवी, मुलगा ओमकार आणि सून अंकिता असे घरी असताना अचानक सुन अंकिता हिची आई व मामी घरी आले. व म्हणाले की, अंकिताची कपड्याची बाग द्यायची आहे. तिला बोलायचे आहे. तिला बाहेर बोलावून घ्या, असे म्हणाले. आम्ही त्यांना चहापाणी करत असताना थोड्यावेळाने अंकिताची आत्या आणि दुसरी मामी, आजी चुलती हे सर्व आले. अंकिताला बोलत बोलत अंकिताची मामी ही अंकिताच्या गळ्याला पडण्याच्या बहाण्याने तिच्या केसाला धरून घराचे बाहेर ओडले व या सर्वांनी मिळून अंकितास, “तू हे लग्न करून चांगले केले नाहीस” म्हणून केसाला धरून खाली पाडले. व लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. तेव्हा मी व माझा मुलगा ओमकार सदरचे भांडण सोडविण्यास गेलो होतो. तेव्हा तेथे सून अंकिताचा भाऊ गणेश कुमदाळे, व वडील राजू कुमदाळे, मामा धनु आणि दुसरा एक मामा त्याचे नाव माहित नाही. आजोबा हे सर्वजण आले. व “आज यांना सोडायचे नाही, त्यांनी आपल्या मुली सोबत लग्न करून वाईट केले आहे.” म्हणून आमच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाथा बुक्क्यांनी व विटांनी मारण्यास सुरुवात केली. गणेश कुमदाळे यांचा मामा धनु याने त्याच्या हातातील लोखंडी मारतुल माझा मुलगा ओमकार याचे पाटीत, छातीत डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
धनु चा भाऊ याने त्याच्या हातातील लहान चाकूने माझ्या पाठीत डावे बाजूस जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले.विटाने माझ्या डोक्यात डाव्या बाजूला मार लागल्याने व मुलाचे छातीत व पाठीत गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव होत असल्याने आम्ही पोलीस स्टेशन मधून वैद्यकीय उपचारासाठी अधिकृत पत्र घेऊन सरकारी दवाखाना लातूर येथे उपचारासाठी दाखल झालो. सरकारी दवाखाना येथील डॉक्टरांनी माझ्या मुलांचे छातीचा एक्स-रे व स्कॅन करायला सांगितले. तेथे जास्त वेळ लागेल म्हणून मी तिथून डॉक्टरांची परवानगी घेऊन आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर लातूर येथे पुढील उपचार करण्यासाठी दाखल झालो. त्या ठिकाणी डॉक्टरांनी माझ्या मुलावर व माझ्या वर उपचार करून उपचारादरम्यान माझ्या मुलांचे छाती व हृदयाची सोनोग्राफी करून बघितले असता, मुलाचे छातीत रक्त गोठून जमा होत आहे. त्यास अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे रेफर करावे लागेल, असे सांगितल्याने मुलगा ओंकार यास पुढील उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे रेफर केले आहे. माझ्यावर गॅलेक्सी हॉस्पिटल लातूर येथे उपचार चालू असून माझ्या डोक्यात सहा टाके पडलेले आहेत. दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माझ्या घरात घुसून मुलीचे लग्नाचे कारणावरून वरील लोकांनी संगणमत करून मला चाकूने, विटाने व माझ्या मुलास छातीत मारतुलने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अशी विनंती सदरील फिर्यादीमध्ये करण्यात आली आहे. आम्हाला मारहाण होत असताना घाबरून माझी मुलगी व पत्नी घरात जाऊन बसले. अन्यथा त्यांना पण जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले असते. या प्रकरणाचा योग्य तो तपास होऊन आरोपीना योग्य ती शिक्षा करावी. अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणजे आपली पत गेली, प्रतिष्ठा गेली, इज्जत गेली. असे वाटल्याने मुलीच्या नातेवाईकांनी संगणमत करून मुलीच्या सासरवाडीच्या लोकांना जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेला हा हल्ला सामाजिक दृष्ट्या विचार केल्यास निश्चितच लाजिरवाणा म्हणावा लागेल. या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या लोकांचे तर नुकसान झालेच झाले, मारेकऱ्यावरही गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्याही कुटुंबाची वाताहात लागेल आणि आंतरजातीय विवाह मुळे जेवढी नाचक्की झाली असेल असे त्यांना वाटत होते, त्यापेक्षा हजार पतीने नाचक्की या भांडणामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. बुरसटलेली विचार श्रेणी आणि चुकीची धोरणे अशा पद्धतीच्या विचारामुळे असे प्रकार होत असतात.
जग चंद्रावर जात असताना जातीच्या संकुचित विचारांच्या चौकटीत अडकलेला हा समाज बाहेर कधी येणार? “वसुधैव कुटुम्बकम” हा उदात्त्य विचार कधी स्वीकारणार? हा मोठा प्रश्न आहे. वेडगळ विचारधारेतून स्वतःचे नुकसान करणाऱ्या अशा बुरसटलेल्या विचार श्रेणीमध्ये बदल होणे काळाची गरज आहे.
