समाजसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. शरद तेलगाने यांचा मारवाडी युवा मंच तर्फे सत्कार
उदगीर (एल. पी. उगीले) : येथील ख्यातनाम डॉक्टर शरद तेलगणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या 49 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मारवाडी युवा मंच यांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष पवन मुंदडा, उपाध्यक्ष गोविंद मुंदडा, सचिव अमर सारडा, ऋषिकेश नावंदर, दामोदर मोघेकर, मारवाडी युवा मंचचे मार्गदर्शक लातूर जिल्हा रिटेल केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष रामबिलास नावंदर यांनी या सत्कार समारंभात सहभाग घेऊन समाजसेवक डॉ. शरदकुमार तेलगाने यांचा सत्कार केला.
डॉक्टर शरद तेलगाने हे अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील वारकरी संप्रदायाच्या कुशीत वाढलेले, सुसंस्कारित कुटुंबातून आले आहेत. सौ. सुमनताई आणि कचरू तेलगाने यांचे सुपुत्र शरदकुमार आज घडीला सामाजिक जाणीव जपण्यामध्ये आपल्याला धन्य समजतात. बालपणा पासूनच त्यांना सांडोळकर महाराज यांचे सानिध्य लाभल्यामुळे, वारकरी संप्रदायाबद्दल आवड निर्माण झाली. त्यात आई-वडिलांच्या संस्काराची भर पडली. नववी उत्तीर्ण झाल्यानंतर ते उदगीर येथे श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात दाखल झाले. हुतात्म्यांच्या नावाने असलेल्या या शाळेने त्यांना समाजसेवेचे धडे दिले. आपण या समाजाचे काही देणे लागतो, हे भाव त्यांच्यात रुजवले. त्यामुळेच त्यांचा कल वैद्यकीय शिक्षणाकडे वळला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या भागातील रुग्णांना सेवा द्यावी, ही भावना ठेवून त्यांनी उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आर एम ओ म्हणून काम केले. मात्र या कामात देखील अनेक मर्यादा असलेले त्यांच्या लक्षात आले, आणि त्यांनी अर्थकारणापेक्षा समाजकारण मोठे समजून स्वतःचा दवाखाना सुरू केला. जो आज “ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम” म्हणून नावलौकिक झाला आहे. वैद्यकीय सेवेची आवड, समर्पण भावनेने सेवा देण्याची प्रवृत्ती आणि “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” असा उदाते हेतू घेऊन काम करणाऱ्या डॉक्टर शरदकुमार तेलगाने त्यांच्या हाताला यश आहे. अशी धारणा ग्रामीण भागात पसरली. सद्यस्थितीत वैद्यकीय सेवा महागडी झाली असल्याचे बोलले जात असले तरी, डॉ. शरद कुमार तेलगाणे यांनी रुग्णांना आपल्या परीने अर्थसहाय्य करून बरे केले आहे, असेही काही उदाहरणे आहेत. बालपणापासून लोक कल्याणाचे विचार डोक्यात असल्यामुळे निस्वार्थ भाव वाढीस लागला. त्यातच वारकरी संप्रदायामुळे भजन, कीर्तन यामध्येही रुची निर्माण झाली. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन हा आवडीचा विषय घेऊन त्यांनी ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी वेळ देऊन अनेक प्रबोधनात्मक किर्तन केले. दीनदुबळ्यांचा कैवारी म्हणून काम करत असताना संत गाडगेबाबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून लोकजागृतीसाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. आपल्या परिसरातील शिरूर ताजबंद, नेत्रगाव, मादलापूर,यनकी, मानकी, जकनाळ, भोपणी, बनशेळकी, समता नगर, या भागासोबतच सीमावर्ती भागातील कमालनगर, भालकी, तोरणा येथून देखील रुग्ण मोठ्या संख्येने डॉ. शरदकुमार तेलगाणे यांच्यावर विश्वास ठेऊन येतात. सामाजिक भावनेतून त्यांनी अनेक अध्यात्मिक कार्यक्रमात अन्नदानही केले आहे. तसेच ज्या भागात पाणीटंचाई जाणवते, त्या भागातील जनतेला स्वखर्चाने टँकर लावून पाणी पुरवठाही करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या समाजाने आपल्यावर जीवापाड प्रेम केले. त्या समाजात असलेल्या गोरगरीब जनतेला आपण मदतीचा हात दिला पाहिजे. अशा उदात्ते हेतूने ते काम करत असल्याने त्यांना ह.भ.प. तेलगाने महाराज म्हणून देखील ग्रामीण भागात लोक ओळखतात. आपण डॉक्टर आहोत, असा कोणताही अहंपणा त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. तसेच आपण इतके मोठे डॉक्टर आहोत, म्हणून कधी ते सामान्य माणसाला कमी लेखत नाहीत. आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, प्रत्येकाच्या अंत:करणात परमेश्वर आहे. अशा भावनेने ते कार्य करत असल्याने त्यांच्याकडे येणारे लोक कायम त्यांचे मित्र बनत असतात. आता ते वयाच्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
