अहमदपुरात तुंबलेल्या नाल्यांमुळे घाणीचे साम्राज्य ; शिवसेनेच्या वतीने निवेदन
अहमदपूर ( गोविंद काळे )शहरात सर्वच कॉलनीतील नाल्या स्वच्छते अभावी तुंबलेल्या आहेत. कांही ठिकाणी घाण पाणी रस्त्यावर वाहत असून, परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरुन घाणीचे साम्राज्य वाढत आहे. परिणामी लहान मुले, वयोवृध्द नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो. तरी त्वरित तुंबलेल्या नाल्यांची साफ-सफाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे व अन्य कार्यकत्यांनी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे दि. १२ रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदपूर शहरातील सर्व गल्ली, कॉलनी व प्रभागातील नाल्या गेली सात आठ महिन्यापासून स्वच्छ केलेल्या नाहीत. कचरा अडकून त्या तुडुंब भरलेल्या आहेत. काही ठिकाणी तुंबलेले घाण पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरून, घाणीचे साम्राज्य वाढले आहे. लहान मुले व वयोवृध्द नागरिकांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होत असून शहरातील नागरिकांना डेंगू, मलेरिया यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रत्येक प्रभागातील नालीवर बीएससी पावडरची फवारणी करण्यात यावी, डासांचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाय योजना आखाव्यात आणि तुंबलेल्या नाल्यांची साफ-सफाई करण्याचे त्वरीत आदेश नगरपरिषदेस देऊन शहराची स्वच्छता राखावी. अन्यथा नागरिकांच्या आरोग्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उपशहर प्रमुख शिवकुमार बेंद्रे, नितीन मस्के, अंगद उमाटे, राजू बनसोडे, नागेश गोडबोले, अखिल शेख यांची उपस्थिती होती.
