जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशाने शिवाजी हुडे यांचा अर्ज वैध, बाजार समितीच्या निवडणुका रंगत !!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज उदगीर येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्या निकालाच्या विरुद्ध जिल्हा उपनिबंधकाकडे शिवाजीराव हुडे यांनी वकिलामार्फत आव्हान दिले होते. या प्रकरणी सुनावणी होऊन त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. यामुळे निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण होणार असून शिवाजीराव हुडे हे मैदानामध्ये साम-दाम-दंड-भेद या सर्व राजकीय नितीचा अवलंब करत उतरतील, यात तीळमात्र शंका नाही. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटूरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले हे आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवत आहेत. गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या गोटात शिवाजीराव हुडे यांच्या तांत्रिक अडचणीमुळे काही काळ अस्थिरता आणि शांतता पसरली होती. मात्र आता अतिशबाजी करत कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत वाढेल, या तिळमात्र शंका नाही.
काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज मंजूर झाला असला तरीही काही फरक पडत नाही. जनता काँग्रेस सोबत आणि विकासासोबत आहे, असे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते छुपा अजिंठा राबवत भाजपच्या गटाला सहकार्य करत असल्याची चर्चा जोरात चालू आहे. त्यामुळे या निवडणुकात टोकाची चुरस निर्माण झाली आहे. 21 तारखेला उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरीही, कालपर्यंत गप्प असलेली भाजपा आता आक्रमकपणे पुढे येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनलला देखील त्याच ताकतीने पुढे येणे गरजेचे आहे. असे बोलले जात आहे.
