4 मोटरसायकल एक ट्रॅक्टर ट्रॉली सह 3 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपीना अटक

4 मोटरसायकल एक ट्रॅक्टर ट्रॉली सह 3 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपीना अटक

लातूर (एल.पी.उगीले) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लातूर च्या वतीने जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्याच्या संदर्भात तपास कार्य उत्कृष्ट चालू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक करून, चार मोटार सायकल, एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह तीन लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरलेली मोटार सायकल घेऊन संशयित आरोपी नामे मल्लिनाथ उर्फ गोटया रतन धुळे हा मोटारसायकलवर गावात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ लिंबाळा दाऊ, तालुका औसा येथे पोहचून गावातील घरासमोर मोटर सायकल सह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मल्लिनाथ उर्फ गोटया रतन धुळे, (वय 27 वर्ष, राहणार हासेगाव, तालुका औसा, सध्या राहणार लिंबाळा दाऊ, तालुका औसा) असे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटर सायकल काही दिवसा पूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून व पुणे जिल्ह्यातून त्याच्या आणखीन साथीदार नामे पप्पू शामराव लाळे (रा.हसेगाव तालुका औसा,जिल्हा लातूर) यांच्यासोबत मिळून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या आणखीन इतर 3 विविध कंपनीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 1 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी धुळे मल्लिनाथ उर्फ गोटया धुळे याने त्याचा आणखीन एक साथीदार पप्पू लाळे याच्यासह तीन वर्षांपूर्वी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे हद्दीतून एक ट्रॅक्टर- ट्रॉली ची चोरी केली असून ती ट्रॉली काही रक्कम घेऊन नरेंद्र विठ्ठल मुरटे (वय 43 राहणार कोंड जागजी जिल्हा उस्मानाबाद)यांना विक्री केल्याचे सांगितले. तसेच एका साखर कारखान्या समोरून मोकळ्या जागेत लावलेले ट्रॅक्टर हेड त्याचवेळी जप्त करण्यात आले होते ,सदर ट्रॅक्टर चोरी संदर्भात पोलीस ठाणे शिरूर आनंतपाळ येथे सन 2020 साली चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे.

मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक येथील 03 व शिरूर अनंतपाळ येथील ट्रॅक्टर ट्रॉली संबंधात दाखल असलेला एक गुन्हा असे एकूण 04 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस गांधी चौक च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस अमलदार अंगद कोतवाड, नवनाथ हासबे,राजेश कंचे, तुराब पठाण, राहुल कांबळे, मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.

About The Author