अनाधिकृत बॅनर आणि पोस्टरवर कारवाई होणार !
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर शहर आणि ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर आणि इतर ठिकाणीही अनाधिकृत, बेकायदेशीर बॅनर, होल्डिंग लावून गावाचे आणि शहराचे विदृपिकरण केले जात आहे. यासंदर्भात अशा अनाधिकृत होल्डिंग, बॅनर, पोस्टर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी असे बॅनर, पोस्टर लावणाऱ्याना या संदर्भात कल्पना देऊन ज्यांनी अशा पद्धतीचे बॅनर, पोस्टर लावले असतील त्यांना ते तात्काळ काढून घ्यावेत. अशा पद्धतीचा सूचना द्याव्या. असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांनी दिला असल्याची माहिती उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी समाज माध्यमावरून दिली आहे. अनाधिकृत पद्धतीने लावले गेलेले बॅनर, पोस्टर, होल्डिंग हे संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकामार्फत काढून घ्यावेत. अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही जयंती, उत्सवाचे बॅनर परवानगीशिवाय लावता येणार नाही. याची काळजी घ्यावी. आपापल्या गावात अशा पद्धतीचे बॅनर, पोस्टर लागले आहेत का? याची तपासणी करून घ्यावी. अन्यथा लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचनाही पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.