प्रतिभा मुळे यांच्या नेतृत्वात प्रवेश पूर्वतयारी मेळावा संपन्न

प्रतिभा मुळे यांच्या नेतृत्वात प्रवेश पूर्वतयारी मेळावा संपन्न

उदगीर (एल. पी. उगीले) : लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे आणि डाएट मुरुड यांच्या आदेशानुसार स्टार्ट प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान राबवत असताना, शैक्षणिक वर्ष 2023- 2024 इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तोंडार केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे यांनी प्रवेशपूर्व तयारी मेळावा क्रमांक 01 चे आयोजन जि.प. प्रा.शा. कुमठा ( खुर्द ) येथे केले होते . यावेळी केंद्रातील विविध शाळेच्या शिक्षकांनीच पालक, सरपंच, शिक्षक , शिक्षिका , केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , सदस्य , गटशिक्षणाधिकारी आदींच्या भूमिका बजावल्या. प्रवेश घेण्यासाठी गेलेली शिक्षिका पालकांशी कसा संवाद साधते ? आम्ही आमचं लेकरू इंग्रजी शाळेत पाठवू शकत नाही. तुम्हीच इंग्रजी शिकवा, म्हणून जिल्हा परिषद शाळेकडून पालक कशा अपेक्षा व्यक्त करतात ? आदींचा संवाद याठिकाणी घेतला गेला. इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत केले गेले . या मेळाव्या साठी आलेल्या पालकांना त्यांच्या पाल्यांचा आजचा शारीरिक विकास,बौद्धिक/सामाजिक विकास,भावनिक विकास, भाषिक विकास,गणनपूर्व तयारी.आदीं बाबत माहिती दिली गेली. यापुढील 04 ते 06 आठवड्यांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांकडून 12 कृतिपत्रिकांच्या माध्यमातून कोणत्या कृती करून घ्यायच्या , पालकांनी आयडीया कार्डचा कसा वापर करायचा , आपल्या पाल्यांसाठी पालक म्हणून त्यांची काय भूमिका किंवा जबाबदारी असेल यासंबंधी पालकांशी संवाद साधत समुपदेशन करण्यात आले. सहा आठवड्यानंतर म्हणजेच शाळा भरण्यापूर्वी आपल्या पाल्यांमध्ये कोणते बदल झाले ? कोणकोणता विकास झाला ? यासाठी पुन्हा शाळा भरण्यापूर्वी शाळास्तरावर मेळावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पहिलीत येणाऱ्या बालकाचे अपेक्षित मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी पालकांची मदत घेणे हे या मेळाव्याचे उदिष्ट आहे.शाळापूर्वतयारी मेळावा यशस्वी होण्यासाठी तोंडार केंद्रातील जि.प.प्रा.शा. कुमठा व केंद्रातील सर्वच शिक्षकांनी तसेच अंगणवाडी ताई , अंगणवाडी मदतनीस यांनी सहकार्य केले.

About The Author