गैरप्रकार झालेल्या भरती परीक्षेला आरोग्य विभागाचा हिरवा कंदील
राज्यभरात 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षेत प्रचंड गोंधळ व गैरप्रकार झाल्याचे उघड होऊनही, राज्य सरकारने भरती परिक्षेला हिरवा कंदील दाखवला. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करू नये, अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत केली. या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड गोंधळ व गैरप्रकार झाले होते. नागपूरच्या बेरोजगार तरुणाला पुण्यात तर पुण्यातील तरुणाला नागपूरमध्ये भरती परिक्षेसाठी बोलाविण्यात आले. परिक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका सेट फुटला असल्याबद्दल आक्षेप घेणार्या काही तरुणांना मारहाण करण्यात आली होती. त्याचबरोबर परीक्षा घेण्यासाठी निवडलेल्या पाचपैकी तीन कंपन्या काळ्या यादीत होत्या. त्यामुळे संबंधित परीक्षा रद्द करून एमपीएससीद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी नियम 93 अन्वये केली होती. या मागणीला इतरही सदस्यांनी पाठिंबा दिला होता.
या संदर्भात विधान परिषद नियम 97 अन्वये आमदार निरंजन डावखरे, आमदार विनायक मेटे व आमदार भाई गिरकर यांनी मांडलेल्या अल्पकालीन चर्चेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज उत्तर दिले. संबंधित परीक्षा अतिशय व्यवस्थितपणे झाल्या आहेत. या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही. तर एक-दोन बाबी सोडल्या तर सर्व परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्या त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात येऊ नये, अशी विनंती आरोग्य मंत्री टोपे यांनी सभागृहाला केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा उडवत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांत गोंधळ व पोलिस कारवाईही करण्यात आली. मात्र, राज्याचे आरोग्य मंत्री परीक्षेत कोणताही गोंधळ झाला नसल्याचे म्हणत असतील तर आणखी कोणता पुरावा द्यायचा. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या भरतीच्या सर्व परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयारीत आहे. मात्र, स्वतःच्या स्वार्थापायी खासगी कंपनीची नियुक्ती करून महाराष्ट्रातील युवकांचे आयुष्य दावणीला लावले जात आहे, असा आरोप डावखरे यांनी केला.