अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोणी मुलींची छेड काढली तर ?

अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोणी मुलींची छेड काढली तर ?

भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी समाजात असेही अनेक लोक असतात जे महिलांना नाहक त्रास देतात, त्यांची छेड काढत असतात. दरम्यान आता अहमदनगर शहरातून या संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे.
शहरात महिला व मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओचा कोतवाली पोलिसांनी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोडरोमिओवर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यासाठी महिला व मुलींना आता केवळ तक्रार करायची आहे.

मुलींनी तक्रार केल्यानंतर संबंधित रोडरोमिओवर कारवाई केली जात असून आत्तापर्यंत शहरात जवळपास 18 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. खरं पाहता अहमदनगर शहरात दिवसेंदिवस काही अराजक तत्वांकडून, रोड रोमियो कडून महिलांची आणि मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
यावर उपाय म्हणून कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक मोहीम हाती घेतली आहे. या अशा रोड रोमिओवर कारवाई करण्यासाठी त्यांनी तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक आणि एक मोबाईल क्रमांक जारी केला आहे.

याच्या माध्यमातून आता पीडित मुलींना तसेच महिलांना किंवा त्यांच्या पालकांना तक्रार करता येणार आहे. टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा व्हाट्सअप द्वारे ही तक्रार सादर करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महिला व मुलींच्या मागे फिरणे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करणे, अशा पद्धतीने तरुणांनी, रोडरोमिओनी त्रास दिला तर कोतवाली पोलिस ठाण्यात संपर्क साधता येणार आहे.
यासाठी पीडित मुलींनी किंवा पालकांनी 0249/2416117 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच पोलिस निरीक्षक यादव यांच्या 7777924603 या क्रमांकावर देखील पीडित मुलींना संपर्क साधता येणार आहे. यां क्रमांकावर टेक्स्ट, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवून आपली तक्रार पोलिसांपर्यंत पाठवता येणार आहे.

About The Author